Budget 2019: यावेळेस ब्रीफकेस ऐवजी लाल कापडात अर्थसंकल्प
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहीला सर्वसाधारण अर्थसंकल्प थोड्या वेळात सादर होईल.
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहीला सर्वसाधारण अर्थसंकल्प थोड्या वेळात सादर होईल. अर्थमंत्री निर्मला सितारामण या सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यावेळेस अर्थसंकल्पाची कॉपी असलेली पारंपारिक बॅग दिसणार नसून त्याऐवजी लाल रंगाच्या कापडात अर्थसंकल्प दिसत आहे. तर यावेळस अर्थसंकल्पाला 'बही खाता' असे नाव देण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी अर्थसंकल्पाचे दस्तावेज असलेली बॅग माध्यमांना दाखविली. या बॅगेवर अशोक चिन्ह आहे. तसेच बॅगेवर पिवळ्या रंगाची फित दिसून येत आहे.
यावेळेस ब्रीफकेसची परंपरा सोडून लाल रंगाच्या कापडाचा वापर करण्यात आला आहे. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ति सुब्रहण्यम यांनी देखील यासंदर्भात माहीती दिली. आमची ही परंपरा आहे. लाल रंगाच्या कापडात असलेली असलेली कागदपत्रे ही पाश्चिमात्य विचारधारेतून मिळालेली मुक्ती दर्शविते. हा अर्थसंकल्प नसून पुस्तक खाते असल्याचे ते म्हणाले.
घोषणांचा पाऊस
लोकसभा निवडणुकांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात मोदी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. येऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन त्या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्यात आला होता. आता आज सादर होणाऱ्या 'पूर्ण अर्थसंकल्पा'कडे सर्वांचे लक्ष असून, अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी अर्थमंत्री सीतारामन कोणते निर्णय घेतात याविषयी उत्सुकता आहे. दरम्यान, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. केंद्र सरकारकडून शेतकर्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दिले जाऊ शकते. अंतरिम अर्थसंकल्पावेळी सरकारने शेतकर्यांना सहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला होता.