मुंबई : नव्या वर्षाचं बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला मांडणार आहेत. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करणारा नोकरदार वर्ग, अभ्यास ते  परीक्षा घरुन देणाऱ्या विद्यार्थ्यांपासून व्यावसायिक, शेतकरी या साऱ्यांनाच बजेटकडून अपेक्षा आहेत. कोरोना संकटानंतर पहिल्यांदा बजेट जाहीर करण्यात येणार असल्यामुळे सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं बजेट 2021कडे लक्ष लागलंय. यंदाच्या बजेटचं सादरीकरणंही दरवर्षीपेक्षा वेगळं असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोरोनामुळे यंदाच्या बजेटमध्ये एक मोठा बदल होणार आहे. यंदा देशाचं बजेट लाल रंगाच्या कपड्यात नव्हे तर ऑनलाईन पद्धतीत सादर होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीनं हे बजेट सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. यासाठी डिजीटलायजेशनची प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व सदस्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आलंय. प्रश्न आणि त्याची उत्तरे ऑनलाईन पद्धतीनं दिली जाणार आहेत.



मोबाईल एप


अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी युनियन बजेट ऍप लाँच केलंय. ज्यामध्ये बजेट संदर्भात सर्व माहिती नागरिकांना मिळणार आहे. युनियन बजेट ऍपद्वारे स्मार्टफोन यूजर्स हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये बजेट वाचू शकतात. सामान्य जनतेपर्यंत सर्व माहिती पोहचू शकेल हाच या मागचा उद्देश आहे. देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ऍपच्या माध्यमातून बजेट सादर होणार आहे. 


ऍप एंड्रॉयड आणि iOS या दोन्ही मोबाईलवर  उपलब्ध असणार आहे. हे मोबाईल ऍप आर्थिक माहिती विभाग (डीईए) च्या नेतृत्वात नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी)  तयार केले आहे. आर्थिक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ऍपला यूजर फ्रेंडली इंटरफेस असेल.


यामध्ये 14 वेगळ्या केद्रींय बजेटच्या कागदपत्रांचा एक्सेस यूजर्सला मिळणार आहे. त्यामध्ये फायनेंशियल स्टेटमेंट, डिमांड फॉर ग्रांट्स (DG) आणि फायनेंस बिल (Finance Bill) देखील असणार आहे. हे सर्व कागदपत्र यूजर्सला डाउनलोड देखील करता येणार आहे. 



दरवर्षीची बजेट पटलावर येण्याआधी हलवा करण्याची परंपरा देखील यंदा नुकतीच पार पडली. या सोहळ्यानंतर बजेटचं काम सुरू झालंय आणि सर्व कर्मचारी 10 दिवसांसाठी नॉर्थ ब्लॉकमध्ये क्वारंटाइन झालेयत. बजेट तयार होत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नसते.