Budget Session: संसदेतील चर्चेचा स्तर दिवसेंदिवस समृद्ध व्हावा- मोदी
या अधिवेशनात आर्थिक विषय आणि लोकांच्या सबलीकरणासंदर्भात व्यापक चर्चा व्हावी.
नवी दिल्ली: यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात सकस चर्चा व्हावी. दिवसेंदिवस आपल्या चर्चेचा स्तर समृद्ध व्हावा, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगली कामगिरी करून आपण आगामी दशकासाठी चांगली मुहूर्तमेढ रोवली पाहिजे. या अधिवेशनात आर्थिक विषय आणि लोकांच्या सबलीकरणासंदर्भात व्यापक चर्चा व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे. जेणेकरून संसदेतील चर्चेचा स्तर दिवसेंदिवस समृद्ध होईल, असे मोदींनी सांगितले.
थोड्याचवेळात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (NRC) मुद्द्यावरून संसदेच्या परिसरात निदर्शन केली.
उद्या म्हणजे १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडतील. वाढती महागाई आणि सातत्याने घसरणारा विकासदर सावरण्याचं आव्हान सीतारामन यांच्यासमोर आहे. मंदीमुळे अडचणीत आलेल्या उद्योगांना दिलासा देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ४५ विधेयके मांडली जाणार आहेत. यामध्ये सात आर्थिक विधेयकांचा समावेश असून दोन अध्यादेश आहेत. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला २६ पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. विविध पक्षांच्या नेत्यांनी आपापले मुद्दे बैठकीत मांडले. जागतिक परिस्थितीच्या दृष्टीकोनातून सखोल चर्चा करण्याची अपेक्षा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली.