म्हशीच्या मूत्र विसर्जनावरून वाद; एकाचा मृत्यू, दुसरा कोमात
बातमीचे शिर्षक वाचून आश्चर्य वाटून घेऊ नका. खरोखरच अशी घटना घडली आहे. पोलिसांनीही घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
गुंटूर : बातमीचे शिर्षक वाचून आश्चर्य वाटून घेऊ नका. खरोखरच अशी घटना घडली आहे. पोलिसांनीही घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
वादावादीचे पर्यावसन मोठ्या भांडणात
प्रकरण आहे आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील. येथील गुजराला मंडल येथे जंगमेश्वरापुरम येथे रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली. प्राप्त माहिती अशी की, म्हशीने मूत्र विसर्जन केल्यामुळे दोन कुटुंबांमध्ये जोरदार वादावादी झाली. या वादावादीचे पर्यावसन मोठ्या भांडणात झाले. यात दोन्ही कुटुंबातील लोक एकमेकांवर चालून गेले आणि त्यांच्यात मोठी हाणामारी झाली. या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा व्यक्ती कोमात गेला आहे. कोमात गेलेला व्यक्ती मृत व्यक्तीचा भाऊ असल्याचे समजते.
क्रुरता: म्हशीचे कापले स्थन
घटनेबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पोलू चेन्ना रेड्डी यांच्या म्हशीने शेजारीच राहणाऱ्या कोंगाटी नागी रेड्डी याच्या घरासमोर मूत्र विसर्जन केले. त्यामुळे चिडलेल्या नागी रेड्डीने हातात चाकू घेऊन म्हशीचे स्थन कापले. हा प्रकार चेन्ना रेड्डी याची पत्नी सरोजिनम्मा हिने पाहिला. आपला भाऊ येसिरेड्डी श्रीनिवास रेडी आणि पुल्ला रेड्डी याला घेऊन सरोजिनम्मा नागी रेड्डीच्या घरी पोहोचली. तेथे जाऊन तिने म्हशीच्या कापलेल्या स्थनाबद्धल जाब विचारला.
एक जण जागीच ठार
दरम्यान, दोन्ही कुटुंबातील चर्चात्मक वादाने काही मिनिटांतच हाणामारीचे रूप धारण केले. यात नागी रेड्डीने मुसळ आणि धारधार शस्त्राने सरोजिनम्माच्या भावांवर हल्ला केला. भांडणात चेन्ना रेड्डीही गंभीर जखमी झाला. तर, म्हशीच्या मालकाचा भाऊ येसिरेड्डी श्रीनिवास रेड्डी डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला. आरडाओरडा झाल्यामुळे गावकरी जमा झाले पण, कोणिच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी मिळवले परिस्थितीवर नियंत्रण
पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान, कोमात असलेल्या पुल्ला रेड्डी आणि इतर जखमींवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुजराला पोलिस इन्स्पेक्टर वाय रामा राव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, नागी रेड्डी, त्याची मुले वीर रेड्डी आणि श्रीनिवास रेड्डी याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुर आहे. आरोपिंना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवाणगी कारागृहात झाली आहे.