मुंबई : Home Loan News : सध्या देशात महागाईचा वणवा भडकला आहे. आता अशा परिस्थितीत घर घेणे महाग झाले आहे. वास्तविक, प्रथमच घर खरेदी करणारे जे गृहकर्जावर  (Home Loan) वार्षिक 3.50 लाखांच्या व्याजावर कर सवलतीचा लाभ घेत आहेत. आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2022 पासून त्यांना मोठा झटका बसला आहे. केंद्र सरकार प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना कलम 80EEA अंतर्गत कर सवलतीचा लाभ देणे बंद करणार आहे.


आता गृहकर्जावर ही सूट नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून तुम्हाला गृहकर्जावर 1.5 लाख रुपयांची ही अतिरिक्त सूट मिळणार नाही, कारण सरकारने ही कर सूट कालावधी वाढवली नाही. अर्थसंकल्प 2022 मध्ये, सरकारने या कर सवलतीची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केलेली नाही. यामुळे, गृहकर्जावरील या सवलतीचा लाभ नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच 2022-23 मध्ये मिळणार नाही. घरांच्या किमती परवडण्याजोग्या करण्यासाठी गृहकर्जावरील ही करसवलत आर्थिक वर्ष 2019 ते 2022 पर्यंत उपलब्ध होती.


दरम्यान, 2019 च्या अर्थसंकल्पात ही सूट मंजूर करण्यात आली होती. बजेट 2019 मध्ये, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कलम 80EEA अंतर्गत घराच्या किमती आवाक्यात याव्यात यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत आयकर लाभ वाढवला होता, ज्यामुळे घर खरेदीदारांना आयकर सूट मिळत होती. यानुसार, जर घराच्या मालमत्तेचे मूल्य 45 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही गृहकर्जाच्या व्याजाच्या भरणामध्ये 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या आयकर सूटचा दावा करू शकत होता.


याचा लाभ मिळत राहील


गृहकर्जावर आधीप्रमाणेच दोन प्रमुख डिडक्शन मिळत राहील. प्रथम, कलम 24(b) अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतची वजावट मिळत राहील. हे गृहकर्जाच्या व्याजावर उपलब्ध आहे. दुसरे, कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची वजावट देखील उपलब्ध राहील. ही वजावट गृहकर्जाच्या मूळ रकमेवर उपलब्ध आहे.