श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील 'रायझिंग काश्मीर' या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी एक मोठा खुलासा झाला आहे. या हत्याकांडात आतापर्यंत तीन दहशतवाद्यांची नावं समोर आली होती मात्र, आता चौथा संशयित समोर आला आहे. ज्या ठिकाणी बुखारी यांना गोळ्या झाडल्या होत्या त्या ठिकाणचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात चौथा संशयित दिसत आहे. इतकचं नाही तर चौथा संशयित बुखारी यांच्या मृतदेहाजवळ उभा आहे आणि नंतर पिस्तुल घेऊन पळताना व्हिडिओत दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी या दहशतवाद्याच्या शोधासाठी फोटो प्रसिद्ध केला. यानंतर या दहशतवाद्याची ओळख जुबैर कादरी असल्याचं समोर आलं असून त्याला अटक करण्यात आली आहे.



चौथ्या संशयिताला अटक केल्यानंतर जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी एस.पी.पानी यांनी सांगितले की, "बुखारी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. चौथ्या संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा आणखीन तपास सुरु आहे".



समोर आलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, चौथा संशयित आरोपी मदत करण्याचं नाटक करत आहे आणि जेव्हा नागरिकांची संख्या वाढत जाते तेव्हा तो पिस्तुल घेऊन पळ काढतो. चौथ्या संशयिताकडून पिस्तुल जप्त करण्यात आली आहे तसेच त्याने हत्येच्या दिवशी परिधान केलेले कपडेही पोलिसांना मिळाले आहेत.