Bulandshahr violence : `हिंदू मुस्लिम वादात माझ्या वडिलांचा बळी`, `त्या` पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हळहळ
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून...
मुंबई : उत्तर प्रदेशात बुलंदशहर गोहत्या मुद्द्याच्या वादावरुन पेटलेलल्या हिंसाचारात उत्तर प्रदेश पोलीस उपायुक्त सुबोध कुमार सिंग यांना आपले प्राण गमवावे लागले. प्रत्यक्षदर्शी पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गोहत्या तपास प्रकरणी कारवाई करण्यास गेले असता जवळपास ३०० लोकांच्या जमावाने पोलीसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून पोलीस यंत्रणेकडूनही लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार करण्यात आला. पण, संतप्त जमावाडून घडवून आणलेल्या या हिंसाचारात सुबोध कुमार सिंग यांना मात्र आपले प्राण गमवावे लागले.
कुमार यांच्या निधनाचं वृत्त कळताच त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आज दोन धर्मांमध्ये असणाऱ्या मतभेद आणि वादांमुळे माझ्या वडिलांचा बळी गेला आहे, उद्या कोणाच्या वडिलांचा बळी जाणार असा सवाल कुमार यांचा मुलगा अभिषेक याने उपस्थित केला आहे.
'धर्माच्या नावाखाली कोणत्याही हिंसेला दुजोरा न देता मी एक सुजाण नागरिक व्हावं अशीच माझ्या वडिलांची अपेक्षा होती. आज हिंदू-मुस्लिम वादामुळे त्यांचा निष्पाप बळी गेला आहे, उद्या कोणाच्या वडिलांचा बळी जाणार?', असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
कुमार यांच्या मुलाने म्हणजेच अभिषेकने उपस्थित केलेला हा प्रश्न म्हणजे देशामध्ये धर्माच्या नावाखाली हिंसा पसरवणाऱ्यांना आणि परिस्थिती अटोक्यात आणण्यात अपयशी ठरलेल्या शासकीय यंत्रणांना मिळालेली चपराक आहे, असंच म्हणावं लागेल.