अमित जोशी, झी २४ तास, मुंबई : महाराष्ट्रातल्या जवळपास २ लाख कोटींच्या इन्फ्रा प्रोजेक्ट्सवर टांगती तलवार आहे. इन्फ्रा प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अहवाल मागवलाय. गेल्या सहा महिन्यांत इन्फ्रा प्रकल्पांना मंजूर झालेल्या रकमेला उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिलीय. त्यामुळे २ लाख कोटींचे प्रकल्प सध्या धोक्यात आहेत. या सगळ्या प्रकल्पांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बुलेट ट्रेनचं काय होणार? हे सगळे प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही इन्फ्रा प्रकल्पांचा फेरआढावा घेणार आहेत. त्यामध्ये बुलेट ट्रेन, मुंबई नागपूर समृद्धी रस्ता, कोस्टल रोड, वर्सोवा-वांद्रे सी लिंक, ठाणे खाडीवरचा पूल यांचा समावेश आहे. यातलं सगळ्या महत्त्वाचं म्हणजे मोदींचं स्वप्न असलेली अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेन...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन हा तब्बल १ लाख १० हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यासाठी केंद्र सरकार ५० हजार कोटी, आणि महाराष्ट्र आणि गुजरात प्रत्येकी २५ कोटी देणार आहे. त्यापैकी केंद्रानं आतापर्यंत २३५० कोटी तर गुजरातनं १०५ कोटी दिलेत. महाराष्ट्रानं अजून एकही पैसा बुलेट ट्रेनसाठी दिलेला नाही. गुजरातमध्ये ७०५ हेक्टर तर महाराष्ट्रात ८१ हेक्टर जमिनीचं संपादन झालंय.



'बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती आहे' असं सांगत शिवसेनेनं पहिल्यापासूनच बुलेट ट्रेनला विरोध नोंदवलेला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुलेट ट्रेनबद्दल काय करणार? याची उत्सुकता आहे. त्यामुळेच, मोदी-शाहांचं स्वप्न विरुद्ध महाविकासआघाडी असा हा सामना पुढच्या काळात जबरदस्त चुरशीचा होणार आहे.