ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई : मोबाईलवर बोलताना निष्काळजीपणे रस्ता ओलांडू नका.... कुठल्याही परिस्थितीत मोबाईल, चॅटिंग, ऑफिसचं काम या सगळ्यापेक्षा जीव महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल, सेल्फीच्या नादात मोठमोठे अपघात झाले, तरी लोक सुधरत नाहीत... असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातल्या बरेलीत समोर आलाय... लग्नाच्या दिवशीच मोबाईलच्या नादात एका तरुणाचा मृत्यू झालाय... 


तिच्या हातावर मेंदी रंगली होती.....


तिच्या हातावर मेंदी रंगली होती..... घरात लग्नाची धावपळ सुरू होती.... पण एक फोन आला.... आणि एका क्षणात या लग्नघराचं शोकसभेत रुपांतर झालं.... बरेलीमध्ये सिव्हिल इंजिनिअर असलेल्या नरेश गंगवारचं रविवारी लग्न होतं.... संध्याकाळी वरात निघणार होती...  गजबजलेल्या लग्नघरात नरेश सकाळी  व-हाडींबरोबर चहा घेत होता.... तेवढ्यात त्याच्या ऑफिसमधून फोन आला आणि तो फोनवर बोलत बोलत घराबाहेर गेला...... चालत चालत तो रेल्वे रुळांवर पोहोचला..... नरेशकडे दोन मोबाईल होते... एका फोनवर तो बोलत होता आणि त्याचवेळी दुस-या मोबाईलवर मेसेज चेक करत होता..... त्याचवेळी राज्यराणी एक्सप्रेस तिथून जात होती.... नरेशचं ट्रेनकडे लक्ष नव्हतं.... अखेर ट्रेनच्या धडकेत नरेशचा मृत्यू झाला.. 


गेल्या वर्षात किती लोकांना मृत्यू


मोबाईलमध्ये हरवून गेलेल्या पिढीचं नरेश हे आणखी एक दुर्दैवी उदाहरण.... गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि रस्त्यावर चालताना मोबाईलच्या वापरामुळे गेल्या वर्षात भारतामध्ये २१३८ जणांचा मृत्यू झालाय. एसटी चालक मोबाईलवर बोलत असल्यानं एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये नुकतीच घडली. विशेष म्हणजे ज्या वाहतूक पोलिसांवर अशा घटना ऱोखण्याची जबाबदारी असते, ते वाहतूक पोलीसही मोबाईलवर बोलत असल्याचं समोर आलंय. पोलिसांचं काम वाहतूक नियंत्रित करणं आहे की मोबाईलवर बोलणं, असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानंही नुकतेच ताशेरे ओढले होते. मरीन ड्राईव्हवर सेल्फी काढताना तरुणीचा मृत्यू, नागपूरमध्ये सेल्फी काढताना बोट उलटून तरुणांचा मृत्यू, डहाणूत बोट बुडून झालेला विद्यार्थ्यांचा मृत्यू ही जीवघेण्या सेल्फीची गेल्या काही काळातली उदाहरणं.... 


याने होतो घात....


गाडी चालवताना किंवा रस्त्यातून चालताना वाहनांचं भान न बाळगता सेल्फी काढणं, फोटो काढणं, चॅटिंग करणं, फेसबुक पाहणं, सिनेमा पाहणं हे चित्र सध्या सर्रास दिसतं.... प्रत्येक घरातल्या आई वडिलांपासून ते केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींपर्यंत सगळ्यांनी याबद्दल वारंवार चिंता व्यक्त केलीय.... तरीही मोबाईलच्या अतिवापरामधून तरुणाई बाहेर पडायला तयार नाही. ही अतिचंचलता, अति घाई  आणि अति उत्साह विनाशाकडे नेणारा असेल, याचं भान वेळीच बाळगायला हवं.