नवी दिल्ली : वन नेशन, वन रेशन कार्ड, या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी आता देशभरात १ जूनपासून होणार आहे. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी याबाबत माहिती दिली आहे. या योजनेंतर्गत रेशन कार्डधारक देशात कुठेही कार्डचा वापर करू शकतो. सध्या १६ राज्यात ही योजना राबवली जातेय. मात्र, १ जूनपासून संपूर्ण देशात या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन नेशन, वन रेशन कार्ड या योजनेअंतर्गत एकाच रेशन कार्डचा वापर देशभरात कुठेही करता येणार आहे. याआधी ही योजना चार राज्यांमध्ये लागू करण्यात आली होती. आंध्रप्रदेश, तेलंगाना, गुजरात आणि महाराष्ट्रात कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात आली होती. याचं उद्धाटन रानविलास पासवान यांनी ऑनलाईन केलं होतं. ही योजना सफल झाल्यास संपूर्ण देशात लागू करण्यात येण्याच सांगण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी, 'वन नेशन, वन रेशन कार्ड' या योजनेमुळे रेशन दुकानदार ग्राहकांशी कोणतीही मनमानी करु शकणार नाही. यामुळे रेशन दुकानदाराला ग्राहकांचं समाधान करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले होते. 



आता केंद्रीय मंत्र्यांनी १ जूनपासून ही योजना देशभरात लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे कोणत्याही राज्यातील रेशन कार्डधारक, कोणत्याही अन्य राज्यातील रेशनच्या दुकानातून कमी किंमतीत स्वस्त धान्य खरेदी करु शकतात. या योजनमुळे भ्रष्टाचारावर लगाम बसेल. तसंच रोजगार किंवा इतर कोणत्याही कारणास्तव एका ठिकाणाहून, दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या गरीबांना अनुदानित रेशन नाकारले जाणार नाही, यापासून त्यांना वंचित राहावे लागणार नाही.