पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद?
संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मोदींच्या या मंत्रिमंडळात १२ नव्या मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. तसंच या मंत्रिमंडळात शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेनेकडे एक कॅबिनेट मंत्रीपद आहे. शिवसेनेचे खासदार अनंत गिते हे अवजड उद्योगमंत्री आहेत. केंद्रात आणखी एक मंत्रीपद मिळावं ही शिवसेनेची मागणी आहे.
शिवसेनेबरोबरच नुकत्याच लालूंच्या आरजेडीशी फारकत घेऊन भाजपबरोबर बिहारमध्ये सत्ता स्थापन केलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयूलाही मंत्रीपद मिळू शकतं.
संरक्षण, माहिती व प्रसारण, नगर विकास आणि पर्यावरण ही चार महत्त्वाची खाती सध्या रिक्त आहेत. संरक्षण खातं असलेले मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले तर माहिती व प्रसारण आणि नगर विकास खातं असलेले वेंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाले. पर्यावरण मंत्री दवे यांचं निधन झालं. यामुळे या चारही महत्त्वाच्या खात्यांवर पावसाळी अधिवेशनानंतर नवा मंत्री येईल.