महाराष्ट्राच्या `वैभव`चं आसाममध्ये कौतुक, मराठी पोलिसाचं आकाशाएवढं काम
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैभव निंबाळकर यांचा आसाम सरकारकडून सन्मान
नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी आहे. महाराष्ट्रातून आसामच्या सीमेवर पोस्टिंग झालेल्या वैभव निंबाळकर यांचा सन्मान आसाम सरकारकडून करण्यात आला आहे. आसाम आणि मिझोराम सीमेवर त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सर्वात मुख्य बाब म्हणजे आसाम आणि मिझोराम सीमेवर तणाव सुरू होता.
आसाम आणि मिझोराम सीमेवर झालेल्या वादात महाराष्ट्रीयन पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर जखमी झाले होते. त्यांच्यावरील उपचार यशस्वीपणे पूर्ण झाले असून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना आसाम सरकारकडून सन्मानीत करण्यात आलं आहे. वैभव निंबाळकर यांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे.
आसाम मिझोराम सीमेवरील वादामध्ये 6 शहीद झालेल्या पोलिसांना देखील त्यांच्या कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. वैभव निंबाळकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर हे मुळचे बारामतीचे असून त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले आहे.
पुण्यातूनच त्यांनी स्पर्धापरीक्षांचा अभ्यास केला. संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण त्यांनी दिली. वैभव निंबाळकर हे 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
आसाम-मिझोरामवरील सीमेचा वाद काय?
आसाम आणि मिझोरम दरम्यान, सुरू असलेला हा सीमा विवाद 146 वर्ष जुना आहे. 1875 साली इंग्रजांनी मिझोरम आणि आसाममध्ये cachar जिल्ह्यात सीमा निर्धारित केली होती. तेव्हा मिझोरम लुशाई हिल्स म्हटले जात होते. आसाम आणि मिझोरमची सामाईक सीमा 164 किलोमीटर आहे, मिझोरमचे एजवाल, कोलासिब, मामित आणि आसामच्या cachar, हेल कांडी आणि करीमगंज जिल्ह्यांची सामाईक सीमा आहे.
सीमावर्ती भागातील गुटगुटी गावापासून हा वाद सुरू झाला. या गावात मिझोरमच्या पोलिसांनी काही तात्पुरते कॅप लावले होते. आसाम पोलिसांचे म्हणणे आहे की, हे कॅप आसामच्या जमिनीवर आहेत. मिझोरमच्या पोलिसांचे म्हणणे आहे की, हा मिझोरमचा भाग आहे. यावरून झालेल्या वादादरम्यान दोन्ही पोलिसांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये 6 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.