नवी दिल्ली : ही बातमी कोरोनावर औषध कधी शोधलं जाणार, लस आली तर कधी येणार, आणखी किती महिने किंवा वर्ष लागेल का? या प्रश्नांच्या उत्तराच्या जवळपास जाणारी आणि कोरोनावरील औषध संशोधनात पहिल्या टप्प्यात दिलासा देणारी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातली बड्या फार्मा कंपनीत गणली जाणारी कॅडिला हेल्थकेअरचे चेअरमन पंकज पटेल यांनी कोरोना व्हायरसवर औषध शोधून काढल्याचा, तसेच लस देखील लवकरच काही चाचण्यांनंतर आणू असा दावा केला आहे.


मात्र त्यांनी असं म्हटलं आहे की, अजून प्राण्यांवर ही चाचणी सुरू आहे. यात काटेकोर यश मिळाल्यानंतर पुढील ३ महिन्यात सरकारने परवानगी दिल्यानंतर बाजारात आणण्याचा कंपनीचा विचार असल्याचं पंकज पटेल यांनी म्हटलं आहे. तसेच यात नक्कीच आपल्याला यश मिळेल असा दावा देखील त्यांनी केला आहे.


मलेरियासाठी औषध बनवतं कॅडिला ग्रुप
कॅडिला हेल्थ केअर ही कंपनी मलेरियावर देखील औषध बनवते. चीननंतर संपूर्ण जगात जेव्हा कोरोनाची साथ सुरू झाली आहे, तेव्हापासून या कंपनीने औषध बनवण्याच्या दिशेने संशोधन सुरू केलं आहे. 


एबीपी अस्मिता या गुजराथी भाषेतील वृत्त वाहिनीशी बोलताना कॅडिला हेल्थ केअरचे पंकज पटेल यांनी ही माहिती दिली आहे. यात पंकज पटेल यांच्या बोलण्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की, शास्त्रज्ञांनी लस शोधून काढली आहे.


आम्ही लसीचा पहिला लॉट बनवला आहे - पंकज पटेल
पंकज पटेल यांनी म्हटलं आहे की, आम्ही वॅक्सिन डेव्हलपमेंटच्या दिशेने प्रयत्न आधीपासूनच सुरू ठेवले आहेत. पहिला टप्पा आम्ही पार केला आहे, सध्या प्राण्यांवर आम्ही ही टेस्टिंग सुरू केली आहे. पुढील महिन्यात प्राण्यांवरील जी चाचणी केली जाणार आहे, त्याचे रिझल्टस आम्हाला मिळतील. 


जर ही चाचणी योग्य दिशेने जाणारी आणि प्रभावी ठरली तर आम्ही क्लिनिकल ट्रायलच्या दिशेने जावू. आम्हाला अपेक्षा आहे की, पुढच्या क्वार्टरमध्ये आम्ही लस लॉन्च करू.


यानंतर पंकज पटेल यांनी सांगितलं, प्राण्यांवरील चाचणी पूर्ण झाली आणि त्यात यश मिळालं, तर माणसांवर ही लस वापरण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची योग्य ती प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे.


कोरोना व्हायरसवर जगात अजूनही कोणतंही औषध किंवा लस निघालेली नाही. उपचार करताना रुग्णांना वेगवेगळ्या औषधी दिल्या जात आहेत. वेगवेगळ्या उपचारांनी रुग्णांना ठिक केलं जात आहे. या दरम्यान कॅडिला ग्रुपचा दावा जर सत्यात उतरला तर कोरोनाचं उच्चाटन करण्यात हे सर्वात मोठं यश असणार आहे.