Indian Canada Controversy : कॅनडातून उच्चस्तरिय अधिकारी आणि राजदुतांना माघारी बोलवणाऱ्या भारत सरकारच्या निर्णयावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान असण्याच्या नात्यानं माझ्या देशातील नागरिकांची सुरक्षितता माझ्यासाठी सर्वतोपरि असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतंही पाऊल उचलायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असं ट्रूडो यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, कॅनडातील खलिस्तानवाद आणि भारतविरोधी कारवायांवर मात्र कोणतंही वक्तव्य केलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कोणताही पुरावा नसतानाही कॅनडातील पोलिसांनी भारतीय एजंट खलिस्तान समर्थकांना निशाण्यावर घेण्यासाठी लॉरेन्स बिष्णोई गँगसोबत काम करत असल्याचा गंभीर आरोपही केला. भारताच्या वतीनं कॅनडामध्ये असणाऱ्या उच्चस्तरिय अधिकाऱ्यांना 19 ऑक्टोबरपूर्वी देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इथं भारतानं ही कारवाई केली असतानाच तिथं ओटावामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ट्रूडो यांनी भारत सरकारवर गुन्हेगारी कारवायांना समर्थन करत मोठी चूक करत असल्याचा गंभीर आरोप लावला. 


'मागच्या आठवड्यात मी जेव्हा पंतप्रधान मोदींशी संवाद साधला तेव्हा सिंगापूरमध्ये होणारी संरक्षण सल्लागारांसोबतची बैठक किती महत्त्वपूर्ण आहे याबाबतची कल्पना दिली होती. त्यांना या बैठकीची कल्पना होती', असं म्हणत या बैठकीचं गांभीर्य आपण त्यांना पटवून दिल्याचं ट्रूडो म्हणाले होते. 


भारत एक महत्त्वाचं लोकशाही राष्ट्र असून, हे सर्व कॅनडा आणि भारतातील नात्यात दुरावा निर्माण करण्यासाठी केलं जात नाहीय असं सांगताना ट्रूडो यांनी भारतासोबतच्या व्यापारी  संबंधांवर उजेड टाकला. यावेळी त्यांनी हरदीप सिंग निज्जर या मुळच्या कॅनडाच्या रहिवासी नागरिकाची हत्या होण्यामागे संभवत: भारताचा हात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. ही चिघळलेली परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आपण एकत्र काम करण्याची गरजही कॅनडाकडून व्यक्त करण्यात आली. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra weather News : मुंबई, कोकणात पुढील 24 तास वादळी पावसाचे; मान्सूनची Final Exit कधी? 


कॅनडाच्या धर्तीवर एखाद्या कॅनडियन नागरिकाची हत्या होणं ही दुर्लक्षित राहणारी बाब नाही, असंही ट्रूडो म्हणाले. कॅनडानं यावेळी पारदर्शक दृष्टीकोन आपलासा करत भारताकडून सहकार्याची अपेक्षा ठेवली आहे असं म्हणत त्यांनी भारताकडून सातत्यानं नकारात्मक भूमिका घेण्यात आल्याची, आपल्यावर वैयक्तिक रोष ठेवण्याची आणि कॅनडा सरकारसह पोलीस यंत्रणेच्या प्रामाणिकपणावर हल्ला करण्याचीच बाब समोर आणत तीव्र नाराजी व्यक्त केली. 




फक्त पंतप्रधान ट्रूडोच नव्हे, तर रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस (RCMP) पथकानंही भारत सरकारचे 'एजंट' कॅनडाच्या धर्तीवर दहशतवादास प्रोत्साहन देत लॉरेन्स बिष्णोई गँगसह काम करत असल्याची आगपाखड केली. कॅनडा आणि तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण भारतासोबतच काम करत असल्याचं ट्रुडो म्हणाले. सध्या कॅनडा आणि भारतामध्ये तणावाच्या परिस्थितीमध्ये वाढ झाली असून, याचे परिणाम तिथं शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी गेलेल्यांवर दिसून येणार असल्याचंही स्पष्ट दिसत आहे. तेव्हा आता या परिस्थितीवर भारताची काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.