Maharashtra weather News : मान्सून परतण्याची तारीख आता नजीक असतानाच हा हंगामी पाऊस राज्यातून काही काढता पाय घेत नसल्याचच पाहायला मिळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, काही भागांमध्ये वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्यात सध्या परतीच्या पावसाचा जोर वाढला असून, बहुतांशी भागांमध्ये पावसाचे ढग अडचणी वाढवताना दिसत आहेत. सध्याच्या घडीला राज्यातील हवामानाची एकंदर स्थिती पाहता मध्य महाराष्ट्र, कोकणासह विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातही वादळी पावसाच्या सरींची हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला.
राज्यातील एकंदर हवामान पाहता कमाल आणि किमान तापमानात अंशत: वाढ होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर, काही भागांमध्ये वाढती उष्णता अडचणींमध्ये भर टाकताना दिसत आहे. राज्यात उच्चांकी तापमानाची नोंद ब्रह्मपुरी इथं करण्यात आली असून, इथं तापमान 36.4 अंशांवर पोहोचलं आहे. राज्यात सध्या हवामानात सातत्य दिसत नसून, सांगली आणि सोलापूरमध्येही पावसाची हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी पावसानं परतीचा प्रवास सुरु केला असला तरीही हा प्रवास काहीसा धीम्या गतीनं होताना दिसत आहे. त्यामुळं हा मान्सून आता नेमका कधी परतणार? हाच प्रश्न अनेकांना पडत आहे. हवामान विभागानं या प्रश्नाचं उत्तर देत मान्सून लवकरच देशासह महाराष्ट्राचाही निरोप घेणार असल्याचं सांगितलं. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आतापर्यंत पूर्व भारतातील राज्यांमधून मान्सूननं माघार घेतली असून, पुढील 48 तासांमध्ये तो ओडिशा, छत्तीसगढ आणि गुजरातसह मध्य प्रदेशातूनही माघार घेईल. दरम्यानच्या काळात तामिळनाडू आणि केरळात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असेल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.