भांडवलशाही गंभीर धोक्यात- रघुराम राजन
भांडवलशाही कमजोर पडत असल्याचे मला वाटते असे रघुराम राजन म्हणाले.
नवी दिल्ली : समाजातील संभाव्य 'विद्रोह' ची परिस्थिती पाहिल्यास भांडवलशाहीस 'गंभीर धोका असल्याचे वक्तव्य भारतीय रिझर्व बॅंक (RBI) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. विशेषत: 2008 च्या जागतिक मंदीनंतर आर्थिक मंदीनंतर राजकीय व्यवस्था जनतेला समान संधी उपलब्ध करुन देऊ न शकल्याचेही त्यांनी म्हटले आहे. युनिवर्सिटी ऑफ शिकागोमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
अर्थव्यवस्थेबद्दल विचार करत असताना जगभरातील सरकारे सामाजिक असमानतेकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत. भांडवलशाहीला गंभीर धोका आहे असे मला वाटते. कारण यामध्ये लोकांना संधी मिळत नाही आहे. जेव्हा असे होते तेव्हा भांडवलशाही विरोधात विद्रोह उभा राहतो असेही आंतरराष्ट्रीय आर्थिक निधी (आयएमएफ) चे माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञाने सांगितले.
भांडवलशाही कमजोर पडत असल्याचे मला वाटत आहे. कारण इथे लोकांना समान संधी मिळत नाही. भांडवलशाही लोकांना समान संधी देत नाही. प्रत्यक्षात जे लोक याच्या प्रभावाखाली आहेत त्यांची स्थिती बिघडल्याचेही रघुराम यांनी सांगितले. संसाधनांचे संतुलन राखणे गरजेचे आहे. तुम्ही तुमची आवड आहे म्हणून काहीही निवडू शकत नाही. मिळणाऱ्या संधी उपलब्ध करणे आणि त्यात सुधार आणण्याची प्रत्यक्षात गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
'सर्वसाधारण शिक्षणानंतर मध्यमवर्गीयांना नोकरी मिळवणे शक्य होते. पण 2008 च्या जागतिक आर्थिक संकटानंतर परिस्थिती बदलली आहे. जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुम्हाला खरोखर चांगल्या शिक्षणाची गरज आहे असेही यावेळी रघुराम राजन यांनी म्हटले.