फरार मेहुल चोक्सी याला आणण्यासाठी डोमिनिकाला गेलेले विमान दिल्लीत दाखल, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण
फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi)याला डोमिनिका येथून भारतात परत आणण्यासाठी पाठवलेले विमान शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले आहे.
मुंबई : फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi)याला डोमिनिका येथून भारतात परत आणण्यासाठी पाठवलेले विमान शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले आहे. मेहुल चोक्सी प्रकरणी डोमिनिका उच्च न्यायालयात (Dominica High Court) सुनावणी सुरु आहे. दरम्यान, ही सुनावणी सध्या तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे सीबीआयटी टीम रिकाम्या हाती माघारी परतली आहे. भारत चोक्सीला प्रत्यार्पणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. हे पाहता डोमिनिका येथे सीबीआयची टीम तळ ठोकून होती. ज्याची कमांड सीबीआय अधिकारी शारदा राऊत (Sharda Raut) यांच्याकडे आहे. राऊत या पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्याच्या चौकशीचे नेतृत्व करीत आहेत आणि मेहुल चोक्सी याला परत आणण्याच्या मोहिमेसाठी मोलाची भूमिका बजावत आहेत.
7 दिवसांचा दौरा
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (सीबीआय) उपमहानिरीक्षक शारदा राऊत या पथकाचे नेतृत्व करीत आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या 13,500 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील (PNB Scam) आरोपी फरार मेहुल चोकसीला परत आणण्यासाठी टीम सात दिवस डोमिनिकामध्ये राहिली.
चोक्सीच्या वकिलांनी डोमिनिका उच्च न्यायालयात हाबियास कॉर्पस याचिका दाखल केली होती, त्यावरील सुनावणी गुरुवारी पुढे ढकलण्यात आली आहे. अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीला किंवा बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतलेल्या त्या व्यक्तीला न्यायालयात हजर राहावे अशी विनंती करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे.
चोक्सी एक महिन्यासाठी डोमिनिकामध्ये !
स्थानिक माध्यमांमधील वृत्तानुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी सुमारे एक महिन्यानंतर होऊ शकते आणि यावेळी चोक्सी डॉमिनिकामध्ये राहील. अँटिगा न्यूजरूमच्या म्हणण्यानुसार, न्यायाधीश बर्नी स्टीफेन्सन चोकसी प्रकरणातील सुनावणीची पुढील तारीख दोन्ही बाजूंची चर्चा केल्यानंतर देण्याची शक्यता आहे.
कोण होते निदर्शक ?
गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. रोसीयू येथील हायकोर्टाच्या संकुलाबाहेर उभे असलेले काहींनी निषेध करणारे फलक लावलेले दिसले, त्यातील एकाने असे म्हटले होते की, 'चोक्सी यांना डोमिनिकामध्ये कोणी आणले?' बुधवारी न्यायाधीशांनी चॉक्सी यांला डोमिनिकामध्ये बेकायदेशीर प्रवेशाच्या आरोपासाठी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्याचे आदेश दिले.
त्याचबरोबर हे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत की हे सर्व विरोधक कोण होते? उल्लेखनीयबाब म्हणजे 23 मे रोजी, चॉक्सी अँटिगा आणि बार्बुडामधून रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाले होते. नंतर तो बेकायदेशीरपणे डोमिनिकात प्रवेश करताना पकडला गेला.
डोमिनिका कोर्टात युक्तिवादसुनावणीत भारताची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी डोमिनिका प्रशासनाबरोबर अनेक फेऱ्यांत चर्चा केल्या आहेत. मेहुल चोक्सीच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती सोबतच टीमने डोमिनिका कोर्टात ईडीचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. या कागदपत्रांद्वारे सांगण्यात आले की चोक्सी हा भारताचा नागरिक आहे. भारतीय टीम कोर्टाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे की, डोमिनिकाच्या ताब्यात असलेली व्यक्ती जानेवारी 2018 पासून भारताला हवी आहे आणि इंटरपोलने दिलेल्या रेड नोटीसच्या आधारे त्याला त्वरित भारतात सुपूर्द केले जावे, अशी मागणी केलेली आहे. मात्र, सुनावणी तहकूब झाल्याने आता वाट पाहावी लागणार आहे.