खूशखबर! पीएफच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता
भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापन मंडळाच्या विश्वस्तांची बैठक येत्या २१ फेब्रुवारीला दिल्लीत होते आहे.
नवी दिल्ली - भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापन मंडळाच्या विश्वस्तांची बैठक येत्या २१ फेब्रुवारीला दिल्लीत होते आहे. या बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. सध्या पीएफवरील व्याजदर ८.५५ टक्के इतका आहे. पण आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये किती वाढ होईल, याचा अंदाज अद्याप वर्तविण्यात आलेला नाही. पण चलनवाढीचा दर कमी राहिल्याचे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नुकत्याच सादर झालेल्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात म्हटले होते. त्यामुळे विश्वस्त मंडळाकडून व्याजदर वाढवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पीएफचे सध्या देशभरात सहा कोटी कर्मचारी सदस्य आहेत. अनेक कर्मचारी निवृत्तीनंतरचा उत्पन्नाचा स्रोत म्हणून पीएफकडे बघत असतात. गेल्या काही वर्षांपासून पीएफच्या व्याजदरात विविध कारणांमुळे वाढ करण्यात आलेली नाही. पण येत्या २१ फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून समजते. एप्रिल-मेमध्ये लोकसभेची निवडणूक होते आहे. त्यामुळे त्यापूर्वी पीएफवरील व्याजदरात वाढ करून देशातील नोकरदारांना खूश करण्याचा पर्याय सरकार निवडू शकते.
पीएफवर वार्षिक किती व्याज दिला जावा, याचा निर्णय विश्वस्त मंडळाकडूनच घेतला जातो. केंद्रीय कामगार मंत्री विश्वस्त मंडळाचे प्रमुख असतात. विश्वस्त मंडळाने व्याजदराचा निर्णय घेतल्यावर तो मंजुरीसाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जातो. अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर संबंधित व्याज पीएफधारकांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केली जाते.