CDS Gen Bipin Rawat Chopper Crash: सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि 12 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा उच्चस्तरिय तपास करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. आता या दुर्घटनेचं कारण समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वायुसेनेने यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. यात म्हटंल आहे 'ट्राय-सर्व्हिसेस कोर्ट ऑफ इन्क्वायरी'ने हेलिकॉप्टर अपघाताचे (Mi-17 V5)प्राथमिक निष्कर्ष सादर केले आहेत.  हेलिकॉप्टर अपघातामागे तांत्रिक बिघाड, तोडफोड किंवा निष्काळजीपणा ही कारणे नसल्याचा निष्कर्ष कोर्ट ऑफ इन्क्वायरीने दिला आहे. तसंच अपघातामागे कोणत्याही प्रकारचा कट नव्हता, असंही अहवालात म्हटलं आहे.


या अहवालात म्हटले आहे की, खराब हवामानामुळे विमान भरकटलं  आणि त्यामुळेच हा अपघात झाला. तांत्रिक भाषेत त्याला CFIT म्हणजेच कंट्रोल्ड फ्लाइट इनटू टेरेन म्हणतात.


चौकशी समितीने हवाई दल आणि लष्कराच्या संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. यासोबतच त्यांनी या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या स्थानिक लोकांशीही चर्चा केली आहे. अपघातापूर्वी ज्या मोबाईलवरून व्हिडिओ शूट करण्यात आला होता, त्याचीही चौकशी करण्यात आली आहे. घटनास्थळावरून एफडीआर म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजेच क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्सही जप्त करण्यात आला आहे. त्याचा डेटाही अहवालात समाविष्ट करण्यात आला आहे.


हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयाने अपघाताच्या कारणाची  चौकशी करण्याचे आदेश दिले होते.


8 डिसेंबर 2021 रोजी देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 12 लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. हेलिकॉप्टर वेलिंग्टन इथून तामिळनाडूतील कुन्नूरकडे जात होतं. दुपारी साडेबाराच्या सुमारास हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.