नवी दिल्ली: आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती आणि दिव्यांग मतदारांना विशेष सुविधा देण्यात येणार आहे. त्यानुसार आता घरबसल्याच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करु शकतील. त्यामुळे या व्यक्तींचा मतदान केंद्रावर जाण्याचा त्रास वाचेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार ८ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. तर ११ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. 


दिल्लीत १.४६ कोटी मतदार आहेत. त्यासाठी १३,७५० मतदान केंद्रे उभारण्यात येतील. १४ जानेवारीला निवडणुकीची अधिसूचना काढण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी असेल. २२ जानेवारीपर्यंत या अर्जांची छाननी होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २४ जानेवारी असेल. 


आतापर्यंत ठराविक विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच सैन्यदल आणि पोलीस कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र, आता निवडणूक आयोगाने अतिज्येष्ठ व्यक्ती आणि दिव्यांगांना ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. 



दिल्लीची यंदाची विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये भाजपला बसलेल्या धक्क्यानंतर दिल्लीत काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत ही आम आदमी पक्ष (आप) आणि भाजपमध्ये रंगण्याची चिन्हे आहेत.


दिल्ली विधानसभेच्या ७० जागा असून गेल्या निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. त्यामुळे यंदा काँग्रेसच्यादृष्टीने उमेदवारांची निवड अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. गेल्यावेळच्या तुलनेत काँग्रेसला अधिक संधी असली तरी त्यांच्यासमोर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे आव्हान असेल. २०१४ मध्ये 'आप'ने जोरदार मुसंडी मारत ६७ जागा जिंकल्या होत्या. तर तीन जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते.