मुंबई : स्वाध्याय परिवाराचे प्रेणेते पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवा वर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. भगवान श्रीकृष्णांची जयंती केवळ दहीहांडी फोडून न करता त्यांचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे या करता दादांनी युवकांना पथनाट्याची संकल्पना दिली. गेल्या 17 वर्षांपासून पूजनीय दादांची सुपुत्री आणि स्वाध्यायाची धुरा सांभाळणाऱ्या सौ. धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांच्या मार्गदर्गनाने पथनाट्याच्या माध्यमातून लाखो युवक देशविदेशात हे विचार घेऊन जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा देशभरातील १६ राज्यांमध्ये तसेच विदेशातही युवकांच्या जवळपास १५,००० टीम्स म्हणजे दीड लाखांहून अधिक युवक 'कहानी छगन की..' या पथनाट्यातून सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त करणार आहेत. मराठी, हिंदी, गुजराती, तामिळ, तेलगु, पंजाबी, उडिया, बंगाली अशा विविध भाषांमधून ही पथनाट्ये २७ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०१८ या काळात सादर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाशिवाय आपलं शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून आणि या सगळ्यामधून वेळ काढून हे युवक पथनाट्य सादर करणार आहेत. आज 'आम्हांला असं वेगळं काही करायला वेळच नसतो' असा जिथे जागोजागी ऐकू येतं त्याच वयोर्टातील हे युवक हा उपक्रम करणार आहेत. हे विशेष गेल्यावर्षी म्हणजे २०१७ साली स्वाध्याय परिवाराच्या या युवकांनी जवळपास ६०,००० ठिकाणी ही पथनाट्ये केली होती व साधारण ५० लाख लोकांनी ही पथनाट्ये पाहिली होती.


आज बऱ्याचदा तरुण प्रलोभनांसमोर झुकताना दिसतो, त्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे विचारांची कमतरता. दुनिया झुकती झुकानेवाला चाहिए, अशीच परिस्थिती बहुतांश वेळा पहायला मिळते. पण भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवतगीतेत सांगितलेले विचार इतके प्रभावी आहेत की ते जीवनात साकार झाल्यास व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र असा उत्तरोत्तर विकास शक्य आहे. मात्र हे प्रभावी विचार तरुणांना मिळत नाहीत, तरुणांपर्यंत पोहोचतच नाहीत. परिस्थितीला कांटाळून, प्रसंगी परिस्थितीला सपशेल शरण जाऊन संकटांपासून पळण्याचा विचार करताना आजचा तरुण दिसतो. पण कृष्णाचे विचार मिळाले तर आजचा युवान देखील हताश, निराश न होता आनंदाने, ताठ मानेने जीवन जगू शकतो. असेच काहीसे विचार या पथनाट्यातून पाहायला मिळणार आहेत.


दहीहंडीची उंची आणि थर यावरच बाष्कळ चर्चा आणि वादंग करताना आपण श्रीकृष्णाची, त्यांच्या विचारांची आणि दहीहंडीच्या उत्सवाची 'उंची' किती खुजी ठरवतोय याचं भानच समाजात कोणाला राहिलेलं नसताना स्वाध्याय परिवाराच्या युवकांची जन्माष्टमी निमित्त सादर होणारी ही पथनाट्य आशेचा एखादा किरण फुलवू शकतील हे नक्की !!