नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाला हाती आला आहे. देशातील अनेक सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवली. ज्यामध्ये अनेक अॅक्टर आणि सिंगर यांचा देखील समावेश आहे. सनी देओल, हेमा मालिनी, जया प्रदा, शत्रुघ्न सिन्हा, रवि किशन, उर्मिला मातोंडकर, कमल हासन, मनोज तिवारी या सारखे कलाकार निवडणुकीच्या रिंगणात होते. भोजपुरी, बंगाली आणि कन्नड सिनेमातील कलाकारांनी राजकारणात आपलं नशीब आजमावलं. पण एका स्टारने मात्र या सगळ्या कलाकारांना मागे टाकत मोठ्या अंतराने विजय मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी देओल, हेमा मालिनी, रवी किशन या सारख्या मोठ्या कलाकारांना देखील इतक्या फरकाने विजय मिळवता आला नाही. पण सूफी सिंगर हंसराज हंसने यांना सगळ्यांना मागे टाकलं. हंसराज हंस भारतीय जनता पक्षाकडून नॉर्थ वेस्ट दिल्लीमधून निवडणूक लढवत होते. हंसराज हंसने आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला 5 लाख 53 हजार 897 मतांच्या अंतराने पराभूत केलं. 


सेलिब्रिटींमध्ये सर्वात मोठ्या अंतराने विजय मिळणारे हंसराज हंस हे पहिले व्यक्ती ठरले. गोरखपूरमधून रवी किशन यांनी 3 लाख 1 हजार 664 मतांनी, हेमा मालिनी यांनी 2 लाख 93 हजार 471 मतांनी तर, सनी देओल यांनी 82 हजार 459 मतांनी विजय मिळवला.



2 एप्रिल 1962 ला पंजाबच्या जालंधरमध्ये शफीपूर गावात जन्म झालेल्या हंसराज हंस  हे पंजाबी फोक साँग आणि सूफी गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. हंसराज हे अमेरिकेच्या वॉशिंगटन डीसी यूनिवर्सिटीचे सन्माननीय प्रोफेसर आहेत. याशिवाय ते सॅन जोस स्टेट यूनिवर्सिटीमध्ये देखील संगीत शिकवतात.


हंसराज यांनी 2009 मध्ये राजकारणात प्रवेश केला. ते आधी पंजाबमधील शिरोमणी अकाली दलमध्ये होते. त्यांनी जालंधरमधून निवडणूक लढवली होती. 2014 मध्ये त्यांनी अकाली दलला रामराम केला. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


10 डिसेंबर 2016 मध्ये हंसराज यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि 2019 च्या निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना उमेदवारी देखील दिली आणि त्यांनी विजय मिळवला.