नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिल्लीमध्ये जनगणना भवनाची पायाभरणी केली. जनगणना देशाच्या भविष्याच्या विकासाची योजना बनवण्याचा आधार आहे. त्यासाठी लोकांचा सहभाग गरजेचा आहे. १८६५ पासून आतापर्यंत ही १६वी जनगणना होणार आहे. अनेक बदल आणि नव्या पद्धतींनंतर आता जणगणना डिजिटल होणार असल्याचे अमित शाह म्हणाले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी मोबाईल अॅपचा वापर केला जाणार असल्याचे अमित शाहंनी सांगितले. यात डिजिटल पद्धतीने आकडेवारी उपलब्ध होणार आहे. जितक्या बारकाईने जनगणना होईल, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तितकीच मदत मिळणार असल्याचे ते म्हणाले.



डिजिटल जनगणनेसाठी, १६ भाषांचा समावेश करण्यात आला आहे, जेणेकरुन लोक त्यांची माहिती योग्य प्रकारे देऊ शकतील.



डिजिटल जनगणना झाल्याने आधार कार्ड, पॅन कार्ड बँक कार्डसह सर्व कागदपत्र एकाच जागी येतील. त्यामुळे सर्व गोष्टी योग्य प्रकारे केल्या जाऊ शकतात. 


आतापर्यंतच्या सर्व जनगणनांपैकी सर्वाधिक खर्च यावेळी करण्यात येणार आहे. यावेळी जनगणनेमध्ये सरकार जवळपास १२ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.