देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता
येत्या १४ तारखेला लॉकडाऊनचा कालावधी संपत आहे.
नवी दिल्ली: कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवला जाण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे अनेक तज्ज्ञ आणि राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची विनंती केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारही याच दिशेने विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लॉकडाऊन संपल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी सरकारचा ड्राफ्ट तयार
येत्या १४ तारखेला लॉकडाऊनचा कालावधी संपत आहे. त्यामुळे यानंतर सरकार काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळीच सरकार लॉकडाऊनंतर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आणि विमान वाहतूक सुरु करणार असल्याची माहिती पुढे आली होती. यासाठी कठोर निर्बंध लादले जाणार असल्याचेही सांगितले जात होते. परंतु, येत्या सात दिवसांमध्ये त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत अजून कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.
तर दुसरीकडे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४४२१ इतका झाला असून त्यापैकी ११४ जणांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ७४८ रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील वरळी-कोळीवाडा, धारावी आणि अन्य झोपडपट्टीच्या परिसरात कोरोनाचा वेगाने फैलाव सुरु झाला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.