नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर परिसरात नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या भागांमध्ये पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि गोळीबारामुळे भारतीय केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सरकारने पूंछमध्ये ४०० आणि राजौरी भागात २०० बंकर उभारण्याची परवानगी दिली आहे. भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये सध्या सुरू असणारी तणावाची परिस्थिती पाहता पुढच्या महिन्याभराते हे बंकर बांधण्याचं काम पूर्णत्वास जाणार असल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजौरी आणि पूंछ भागात याआधी २०० बंकरना परवानगी देण्यात आली होती. पण, आता हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार या बंकरची संख्या वाढवण्यात आली आहे. वारंवार सीमेपलीकडून होणारे हल्ले पाहता या महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 


प्रशासनाकडून या बंकरच्या उभारणीचं काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या गोळीबाराचा फटका हा त्या भागात असणाऱ्या गावकऱ्यांनाच जास्त बसतो. अशा वेळी बंकर अतिशय फायद्याचे ठरतात. दरम्यान, जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा या भागात आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान सीमेनजीकच्या तणावाच्या वातावरणात आणखी भर पडली. 



जाणून घ्या : बालाकोटच्या यशात 'नेत्रा'च्या कटाक्षाचं महत्त्वपूर्ण योगदान


पुलवामा हल्ल्याचं उत्तर म्हणून भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारांच्या सत्रात आणखी वाढ झाली. या साऱ्या तणावग्रस्त वातावरणाचा पूंछ येथे असणाऱ्या स्थानिकांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. झी न्यूजने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पूंछच्या सत्रोली भागात झालेल्या गोळीबारात एकाच कुटुंबातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले. तर, एक व्यक्ती जखमी झाली. इतकच नव्हे तर या भागातील घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.