`या` विद्यार्थांना सरकार लवकरच देणार दरमहा ७५,००० रुपये!
भारतासमोर वाढतेय `ब्रेन ड्रेन` ची समस्या
जयपूर : भारतातील सदोष उच्च शिक्षण व्यवस्था आणि त्यातून अपेक्षापूर्ती करण्यास असमर्थ असणार्या करिअरच्या वाटा पाहता भारतासमोर 'ब्रेन ड्रेन' ही समस्या वाढत आहे. म्हणजे अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण आणि रोजगारासाठी भारताबाहेर जाणं पसंत करत आहेत.
‘ब्रेन ड्रेन' ही समस्या रोखण्यासाठी लवकरच सरकारतर्फे ‘पंतप्रधान शिष्यवृत्ती’ची घोषणा करण्यात येणार आहे. ही माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
पंतप्रधान शिष्यवृत्ती अंतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या १ हजार विद्यार्थ्यांना दरमहा ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देणार असल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी जयपूरमध्ये मणीपाल विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात दिली आहे.
पंतप्रधानांचा तरुणांच्या सामर्थ्यावर विश्वास असून देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत असे जावडेकर यांनी म्हटले. देशातील २० विद्यापीठांमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण आणि सुविधा उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा मानस आहे. जगातील सर्वोत्तम २०० विद्यापीठांमध्ये देशातील २० विद्यापीठे असावीत, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत,’असे जावडेकर दीक्षांत सोहळ्यात म्हणाले.