मुंबई : देशभरात coronavirus कोरोना वाढीचा आलेख एकिकडे उंचावत असतानाच दुसरीकडे त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांच्या बळावर देशाची या विषाणूशी सुरु असणारी झुंज काही बाबतीत यश मिळवताना दिसत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे त्याचच एक उदाहरण. दरम्यान, सर्वत्र कोरोनामुळं चिंतेचं वातावरण असतानाच केंद्रान या संसर्गाच्या निरीक्षणासाठी नेमलेल्या समितीनं एक दिलासादायक बाब स्पष्ट केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा झपाट्यानं फैलाव होत असताना हैदराबाद आयआयटीचे प्राध्यापक एम. विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखालील एका समितीच्या अहवालानुसार सध्या फोफावणारी कोरोनाची लाट फेब्रुवारी महिन्यात उतरणीला लागेल. तोपर्यंत लस विकसित झाल्यास हा संसर्ग बऱ्याच अंशी नियंत्रणातही आलेला असेल. हा एक प्रकारे मोठा दिलासा असला तरीही योग्य काळजी न घेतल्यास कोरोना रुग्णांची संख्या तोवर १.६ कोटींच्या घरात पोहोचू शकते. सणासुदीच्या दिवसांची पार्श्वभूमी पाहता रुग्णसंख्येत तब्बल २६ लाखांनी वाढ होण्याचा संभाव्य धोक्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 


सदर समितीला हा अहवाल पाहता, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि त्यानंतर येणाऱ्या नाताळसणाच्या दिवसांमध्ये कोरोनाबाबत अधिक सावधगिरी पाळली जाणं गरजेचं असेल हेच स्पष्ट होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करत, मास्क आणि सॅनिटायझरचाही वापर करण्याचाच सल्ला सर्व अभ्यासकांकडूनही देण्यात येत आहे. 


 


कोरोना व्हायरसमुळं मागील कित्येक महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आतापर्यंत देशभरात या विषाणूच्या संसर्गानं लाखोंचा बळीही घेतला आहे. पण, धोका अद्यापही कमी झालेला नाही. कारण, कोरोना साथीबाबतच्या संशोधनात योगदान देणाऱ्या डॉ. व्ही.के. पॉल यांच्या म्हणण्यानुसार हिवाळ्यात देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.