#JetAirways : मुकेश अंबानी ठरणार जेट एअरवेजचे तारणहार?
अंबानींनी हा निर्णय घेतला तर....
मुंबई : आर्थिक अडचणीत अडकलेल्या जेट एअरवेजविषयी सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे. अनेकांच्या नोकरीवर या आर्थिक संकटामुळे टांगती तलवार आल्यानंतर आता अखेर जेटच्या मदतीला खुद्द अंबानी पुढे सरसावल्याचं म्हटलं जात आहे. एकिकडे बँकेने जेटला तात्काळ आर्थिक मदत देण्यास नकार दिला असतानाच पुन्हा या कंपनीला नव्याने उभं करण्याचे प्रयत्नही दुसरीकडे सुरू आहेत. यातच आता एक दिलासा देणारं वृत्त समोर आल्याचं कळत आहे.
रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे जेटच्या शेअर्समध्ये भागीदारी घेण्याच्या निर्णयावर पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी कंपनीकडून कोणतीच अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. शिवाय शेअर खरेदी करण्यासाठीचं एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणजेच (EoI) ही देण्यात आलं नसल्यामुळे सध्या याविषयीच्या बऱ्याच चर्चा आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार एतिहाद एअरवेजही जेट एअरवेजमध्ये भागीदार होण्यासाठी उत्सुक आहे. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे २४ टक्के भागीदारी आहे. किंबहुना संबंधित कंपनीकडून जेटमध्ये भागीदारीसाठीचं EoI सुद्धा दाखल करण्यात आलं आहे. या माध्यमातून अंबानी जेटसाठी तारणहार ठरु शकतात आणि या साऱ्यात एतिहादची जेटमधील भागीदारी ४९ टक्क्यांवर पोहोचेल.
जेटच्या कर्मचाऱ्यांना या आर्थिक संकटाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. या अडचणीतून बाहेर येण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अर्थमंत्र्यांचीही भेट घेतली. जेटच्या सर्व कर्मचाऱ्यांना कमीत कमी एक महिन्याचं वेतन देण्यासाठी जवळपास १७० कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे आता या अडचणींचा सामना नेमका कसा केला जाणार याकडेच अर्थविश्वाचं लक्ष लागलं आहे.