देवगौडांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकात राजकीय भूंकप येण्याची शक्यता
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पडण्याच्या मार्गावर?
बंगळुरु : माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एचडी देवगौडा यांच्या एका वक्तव्यानंतर कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. एचडी देवगौडा यांनी म्हटलं की, 'कर्नाटकात कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. काँग्रेस ज्या प्रकारे वागते आहे. ते जनता पाहत आहे. हे सरकार किती दिवस टिकेल हे मी नाही सांगू शकत.'
देवगौडा यांनी म्हटलं की, ''मी कधीच म्हटलं नव्हतं की आघाडी झाली पाहिजे. मी हे आज पण म्हणतोय आणि उद्या पण म्हणेल. काँग्रेस आमच्याकडे आली आणि त्यांनी म्हटलं की, तुमचा मुलगा मुख्यमंत्री बनेल. तेव्हा मला हे माहित नव्हतं की. त्यांच्या इतर नेत्यांमध्ये सहमती होती की नव्हती. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने आपली ताकद गमावली आहे असं वाटतंय.
''आमच्या कडून कोणताच धोका नाही. मला नाही माहित की हे सरकार किती दिवस टिकेल. हे कुमारस्वामींच्या नाही तर काँग्रेसच्या हातात आहे. आम्ही कॅबिनेटमध्ये आमची एक जागा देखील त्यांना दिली. त्यांनी जे म्हटलं ते सगळं आम्ही केलं. यात काही शंका नाही की मध्यावधी निवडणुका होतील. ते म्हणतात की, 5 वर्ष आम्ही समर्थन करु. पण लोकं त्यांचं वर्तन बघत आहेत''.
एचडी देवगौडा यांनी आणखी एक खुलासा केला आहे की, वरिष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कीर्ती आझाद आणि अशोक गहलोत यांना बंगळुरुला पाठवलं होतं. आमच्या तिघांची बैठक झाली होती. त्यानंतर सिद्धारमैया, मल्लिकार्जुन खरगे, मुनियप्पा आणि परमेश्वर आले. मी त्यांच्या समोर म्हटलं होतं की, मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री करा. यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की, काँग्रेस हायकमांड जर इच्छूक असतील तर मी तयार आहे. त्यानंतर मी आझाद यांचा फोन घेतला आणि राहुल गांधींना म्हटलं की खरगे यांना मुख्यमंत्री करा. पण नंतर आझाद यांनी म्हटलं की, काँग्रेस हायकमांडला कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करायचं आहे. मी त्यांचं म्हणणं स्विकारलं आणि घरी निघून आलो.'
कर्नाटकात 224 विधानसभा जागांसाठी निवडणूक झाली होती. ज्यामध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. भाजपला सर्वाधिक 104 जागा मिळाल्या होत्या. पण त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. काँग्रेसने कोणत्याही अटी शिवाय जेडीएसला पाठिंबा जाहीर केला. कुमारस्वामी यांच्या शपथविधीला सर्व विरोधी पक्षाचे नेते एकाच मंचावर दिसले. पण पुढे काँग्रेस-जेडीएसमध्ये वाद सुरु झाला. तो अजूनही सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपला 28 पैकी 25 जागा मिळाल्या. काँग्रेस, जेडीएस आणि अपक्षांना प्रत्येकी फक्त 1 जागा मिळाली. यानंतर दोन्ही पक्षाला मोठा झटका बसला. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर जाहीरपणे टीका करत आहेत. त्यामुळे एचडी देवगौडा यांची भविष्यवाणी खरी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.