मुंबई : कोरेगाव भीमा आणि चैत्यभूमीवर जाणार असल्याचा निर्धार भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे. पुण्याला रवाना होण्याआधी चंद्रशेखर आझाद यांनी ही भूमिका घेतली. मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे बाहेर का ? असा सवाल उपस्थित करत ही संविधानाची हत्या असल्याचंही आझाद यांनी म्हटले आहे. मात्र पुण्याला जाण्याआधी पोलीस आझाद यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. दरम्यान भीम आर्मीला 2 तारखेपर्यंत  महाराष्ट्रात कोणतीही सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. भीम आर्मीचे कार्यकर्त्यांना ते असलेल्या ठिकाणाहून तिथून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पेलीस ठाण्यात 2 तारखेपर्यंत दररोज हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचबरोबर भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना 2 तारखेपर्यंत भीमा कोरेगांव इथे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आझादांची सभा होऊ न दिल्याने दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांचा रास्तारोको


10 पट अधिक बंदोबस्त 


 गेल्या वेळी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यावेळी कोरेगाव भीमामध्ये वादग्रस्त व्यक्तीमत्वांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या शौर्यदिनासाठी यावेळी कोरेगाव भीमामध्ये गेल्यावेळ पेक्षा 10 पट अधिक बंदोबस्त असणार आहे. इथल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी यावेळी अंदाजे 10 लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे. 


कार्यकर्ते आक्रमक 


 भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील कार्यक्रमला परवानगी नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याचा निषेध म्हणून दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री रास्तारोको केला होता. पुर्व द्रुतगती मार्गावर संतप्त कार्यकर्त्यांचे रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. आझादांची सभा होऊ न दिल्याचा निषेध ठिकठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे.


आझाद नजरकैदेत 


 चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील कार्यक्रमांना देखील आतापर्यंत परवानगी मिळाली नाही आहे. भीम आर्मीतर्फे 30 डिसेंबरला कोरेगाव भीमा संघर्ष सभेचं आयोजन करण्यात आले पण पुण्यात आयोजित केलेल्या सभेलाही अजूनपर्यंत पोलीस परवानगी मिळाली नाही. तसेच काल सकाळी चंद्रशेखर यांना मालाड येथील एका हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्यानेही कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यांनी हॉटेल बाहेर घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची बाचाबाचीही झाली.