आज ISRO ची परीक्षा पाहणार Chandrayaan 3; देशाला मिळणार मोठं गिफ्ट
Chandrayaan 3 Live Location : इस्रोनं पाठवलेलं चांद्रयान 3 आता टप्प्याटप्प्यानं चंद्राच्या आणखी जवळ पोहोचत असून, त्याची कक्षा पुन्हा एकदा कमी करण्यात येणार आहे. पाहून घ्या सध्या कुठंय चांद्रयान...
Chandrayaan 3 Live Location : जुलै महिन्याच्या 14 तारखेला भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात ISRO कडून चांद्रयान 3 अवकाशात पाठवण्यात आलं. चंद्रावर पोहोचण्यासाठी निघालेल्या या यानानं आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वीरित्या ओलांडलेले असतानाच आता ते निर्णायक वळणावर आलं आहे. कारण, 14 ऑगस्ट म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी चांद्रयानाची कक्षा कमी करण्याचं काम इस्रो करणार आहे. सकाळी 11.30 ते 12.30 दरम्यान हा टप्पा पूर्ण होणार असल्याची माहिती इस्रोनं दिली आहे.
सध्या चांद्रयान 3 चंद्रापासून 174 किमी x 1437 किमी च्या अंतरावर असून, चंद्राभोवती अंडाकृती कक्षेत परिक्रमण करत आहे. त्याचं चंद्रापासूनचं सर्वात कमी अंतर 174 किमी आणि सर्वाधिक अंतर 1437 किमी आहे. 9 ऑगस्च रोजी चांद्रयानाची कक्षा कमी करण्यात आली होती. सर्वप्रथम हे कार्य 6 ऑगस्च रोजी इस्रोनं हाती घेतलं होतं. जेव्हा चंद्रापासूनचं त्याचं अंतर 170 किमी x 4313 किमी इतकं होतं.
हेसुद्धा वाचा : देशसंरक्षणार्थ 90 रणगाडे, 68000 सैनिक सीमेवर तैनात; स्वातंत्र्यदिनापूर्वीची सर्वात मोठी बातमी
चांद्रयानानं पाठवले चंद्राचे फोटो
चांद्रयान चंद्रावर पोहोचण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच त्याआधीच दूरवर असणारा चंद्र तुमच्याआमच्या अधिक जवळ असल्याची जाणीव झाली. निमित्त ठरलं ते म्हणजे चांद्रयानानं पाठवलेले फोटो. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर साधारण 164 किमी x 18,074 किमी अंतरावर असतानाच चांद्रयानाच्या ऑनबोर्ड कॅमेऱ्यानं चंद्राची काही छायाचित्र टीपली. इस्रोनं अधिकृत संकेतस्थळावरून हे फोटो सर्वांसमोर आणले होते. या फोटोमध्ये चंद्रावर असणारे क्रेटर्स अर्थात असमान पृष्ठ किंवा खड्डे अगदी स्पष्टपणे पाहायला मिळाले होते. ज्यानंतर चांद्रयानानं आणखी दोन फोटो शेअर केले जिथं एकामध्ये पृथ्वी आणि एकामध्ये चंद्र पाहायला मिळाला होता.
चांद्रयानाच्या प्रवासाचा पुढील टप्पा....
चंद्रापाशी पोहोचण्यासाठी चांद्रयानाची कक्षा कमी केल्यानंतर 23 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या पृष्ठावर पोहोचेल. जिथं, लँडर, रोवर आणि प्रोपल्शन मॉड्युलची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळेल. लँडर आणि रोवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवरावर उतरतील आणि पुढील 14 दिवस त्यांचं काम सुरु राहील. तर प्रोपल्शन मॉड्युल चंद्राच्या कक्षेतच राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचं परीक्षण करेल. या मोहिमेतून इस्रो चंद्रावरील पाण्यापासून तिथं भूकंप कसे येतात इथपर्यंतचं संशोधन करणार आहे.