Galwan Clash LAC : संपूर्ण देश स्वातंत्र्य दिनानिमित्त (Indenpedence day 2023) तयारीला लागलेला असतानाच देशाच्या संरक्षणाशी संबंधित महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. ज्यामुळं सीमाभागात निर्माण झालेली परिस्थिती आणि लष्करी यंत्रणांकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबाबतचा मोठा उलगडा झाला आहे. चीनच्या सैन्यासोबत पूर्व लडाख भागातील गलवानच्या खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर LAC वर भारतीय वायुदलाच्या मदतीनं तातडीनं तब्बल 68000 हून अधिक सैनिक, 90 रणगाडे आणि अन्य युद्ध सामग्री पूर्व लडाखमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती संरक्षण आणि सुरक्षा प्रतिष्ठानमार्फत देण्यात आली आहे.
15 जून 2020 मध्ये चीनसोबतचा संघर्ष आणि त्याचा भूतकाळ पाहता भारतीय वायुदलानं अतीव महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाअंतर्गत वायुदलानां अनेक स्क्वाड्रनना युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार ठेवलं होतं. इतकंच नव्हे, तर शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर 24 तास करडी नजर ठेवण्यासह गुप्त माहिती मिळवण्यासाठी एसयू 30 एमकेआय आणि जग्वार लढाऊ विमानंही सीमाभागात तैनात ठेवली होती.
चीनसोबतच्या संघर्षामुळं वाढणारा तणाव आणि एकंदर परिस्थिती पाहता भारतीय लष्कराच्या वायुदलानं या भागात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. रिमोटच्या आधारे तारणारी विमानं अर्थात आरपीएसुद्धा या भागात तैनात ठेवली होती. याच अंतर्गत लष्कराच्या अनेक तुकड्यांना हवाई मार्गानं एलएसीवरील तळांवर आणण्यात आलं होतं. यामध्ये तब्बल 68 हजारांहून अधिक सैनिक, 330 लढाऊ वाहनं, रडार, 90 रणगाडे आणि इतर लष्करी साहित्यांचाही समावेश होता.
भारत आणि चीनमध्ये होणारा संघर्ष नवा नाही. जवळपास तीन वर्षांहून अधिक काळापासून इथं तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. अर्थात ही तणावाची ठिणगी कैक वर्षांपूर्वीच पडली. पण, गलवानच्या प्रसंगानं त्यात आणखी भर घातली. सद्यस्थितीबाबत सांगावं तर, इथं आताच्या घडीला दोन्ही देशांच्या सीमाभागांमध्ये साधारण 50 ते 60 हजार सैनिक तैनात आहेत. याच धर्तीवर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये सोमवारी एक उच्चस्तरिय बैठक पार पडणार आहे. लष्कर मागे घेण्याबाबतचा कोणता निर्णय आज घेतला जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.