कोंबड्याचं अपहरण करणाऱ्या मुलाला शिक्षा देण्याची वडिलांची मागणी
गाय, म्हैस किंवा कुत्रा हरवल्याचं आणि त्याची तक्रार पोलिसांत दिल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. मात्र, कुणी आपल्या कोंबड्याचं अपहरण केल्याची तक्रार दाखल करेल तर? आश्चर्य वाटतयं ना?. पण असं खरोखर झालयं.
रायपूर : गाय, म्हैस किंवा कुत्रा हरवल्याचं आणि त्याची तक्रार पोलिसांत दिल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. मात्र, कुणी आपल्या कोंबड्याचं अपहरण केल्याची तक्रार दाखल करेल तर? आश्चर्य वाटतयं ना?. पण असं खरोखर झालयं. एका व्यक्तीने चक्क आपल्या कोंबड्यांचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
छत्तीसगढमधील दुर्ग परिसरात असाच एक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या ठिकाणी एका वडिलांची तक्रार दाखल केली आहे, ज्याने आपल्या कोंबड्याचं मुलाने अपहरण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. आपला कोंबडा माझ्या मुलापेक्षाही मला प्रिय असल्याचं या वडिलांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर १ बचत चौक येथे राहणाऱ्या छोटेलाल यांनी आपल्या कोंबड्याचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. माझा मुलगा शंभु यानेच कोंबड्याचं अपहरण केलं असल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अपहरण करणाऱ्या शंभुला कारागृहात टाका आणि माझा कोंबडा परत द्या असंही छोटेलाल यांनी म्हटलं आहे.
छोटेलाल यांनी सांगितले की, माझा कोंबडा लहान होता तेव्हा त्याचं वजन १०० ग्रॅम होतं आणि तेव्हापासून मी त्याचं पालन करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी कोंबड्याचा सांभाळ करत असून तो मला प्रिय आहे. तो माझी भाषाही समजत होता. मात्र, माझा व्यसनी मुलगा घरातून ५ हजार रुपये आणि कोंबडा घेऊन पसार झाला.
आपल्या मुलाने कोंबड्याचं अपहरण केलं आणि त्यानंतर तो खाल्ला असल्याचा संशय छोटेलाल यांनी व्यक्त केला असून त्याला शिक्षा करण्याची मागणी केली आहे.