रायपूर: गेल्या १५ वर्षांपासून भाजपची घट्ट पकड असलेल्या छत्तीसगढमध्ये मंगळवारी सत्तांतर झाले. त्यामुळे काँग्रेस याठिकाणी पुन्हा एकदा सत्तेत आली आहे. छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेकांनी मुख्यमंत्री रमण सिंह यांचा करिष्मा आणि विकासकामांमुळे भाजप पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलने छत्तीसगढमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज अपेक्षेपेक्षा अधिक खरा ठरला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार विधानसभेच्या ९० जागांपैकी ६४ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप अवघ्या १८ जागांवर आघाडीवर आहे. उर्वरित आठ जागा मायावती व अजित जोगी यांच्या आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत छत्तीसगढमध्ये भाजपला ४९ तर काँग्रेसला ३९जागा मिळाल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीच्या निमित्ताने छत्तीसगढमध्ये पहिल्यांदाच तिरंगी लढत अनुभवायला मिळाली. मुख्यमंत्री रमण सिंह यांचा मतदारसंघ असलेल्या राजनांदगावमधील निकालांमध्येही सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहेत. या मतदारसंघात अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांनी रमण सिंह यांना आव्हान दिले आहे. सकाळपासून या दोन्ही नेत्यांमध्ये आघाडी-पिछाडीचा खेळ सुरु आहे. मात्र, एकूणच परिस्थिती पाहता छत्तीसगढमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे जवळपास निश्चित आहे. 


ठळक घडामोडी





* मुख्यमंत्री रमण सिंह यांनी पराभव स्वीकारला; राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द


* छत्तीसगढमध्ये एक्झिट पोलचा अंदाजही चुकला. विधानसभेच्या ९० पैकी ६५ जागांवर काँग्रेस, १७ जागांवर भाजपा आणि अन्य पक्षांचे ८ उमेदवार आघाडीवर 





* काँग्रेसची ४९ जागांवर आघाडी, भाजप २६ तर अजित जोगी- मायवातींची आघाडी चार जागांवर आघाडीवर



* राजनांदगाव मतदारसंघात मुख्यमंत्री रमण सिंह पिछाडीवर
* छत्तीसगढमध्ये सुरुवातीच्या सत्रात भाजपची आघाडी
* छत्तीसगढच्या सात जागांपैकी पाच जागांवर भाजपचे उमेदवार पुढे
* मरवाही मतदारसंघात अजित जोगी आघाडीवर
* वैकुंठपूर, भरतपुर-सोनहट, मनेंद्रगडमध्ये भाजप आघाडीवर
* रायपूर दक्षिण मतदारसंघात मंत्री राजेश मूणत पिछाडीवर, काँग्रेसच्या विकास उपाध्याय यांची आघाडी