नवी दिल्ली : लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असोत. या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाला सक्षम बनवणाऱ्यांमध्ये टीएन शेषन यांचं नाव नेहमीच पुढे येतं. पण हेच ८५ वर्षीय शेषन आता वृद्धाश्रमात आहेत. ९० च्या दशकामध्ये शेषन हे निवडणूक आयोगाचे आयुक्त होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या शेषन चेन्नईच्या ओल्ड एज होममध्ये आहेत. शेषन यांना विसरण्याचा आजार झाला आहे. शेषन हे सत्य साईबाबांचे भक्त होते. सत्य साईबाबांच्या मृत्यूनंतर त्यांना धक्का बसला, यानंतर त्यांना वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं. तीन वर्ष वृद्धाश्रमात राहिल्यावर शेषन यांना घरी नेण्यात आलं. पण काही काळ घरी राहिल्यावर पुन्हा एकदा ते वृद्धाश्रमात आले आहेत.


निवडणूक आयोगाला दिली ओळख


तामिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले शेषन भारताचे १०वे निवडणूक आयुक्त होते. १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६ पर्यंत शेषन निवडणूक आयुक्त होते. शेषन यांनी त्यांच्या कार्यकाळात पारदर्शक पद्धतीनं निवडणूक घेण्याचं काम केलं.


कडक धोरण अवलंबल्यामुळे शेषन यांचे तेव्हाचं सरकार आणि नेत्यांबरोबरही वाद झाले. शेषन निवडणूक आयुक्त होण्याआधी अनेक जणांना निवडणूक आयोगाच्या कामाबद्दल फारशी माहिती नव्हती.


बिहारमध्ये चार वेळा केल्या निवडणुका रद्द


शेषन यांच्या निवडणूक सुधारणेच्या प्रक्रियेला १९९५ साली बिहारमधून सुरुवात झाली. निवडणुकीवेळी होणाऱ्या गैरप्रकारांमुळे बिहार बदनाम होतं. बिहारमध्ये अनेक टप्प्यांमध्ये शेषन यांनी निवडणुका घेतल्या. तसंच बूथ कॅप्चरिंग रोखण्यासाठी त्यांनी सेंट्रल पोलीस फोर्सचाही वापर केला. पोलिसांचा वापर करण्यावरून लालू प्रसाद यादव यांनी थेट आव्हान दिलं होतं.


एवढच नाही तर शेषन यांनी चार वेळा बिहार निवडणुकींच्या तारखांमध्ये बदल केले. तसंच निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी शेषन यांनी पाच टप्प्यांमध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका घेतल्या.


राष्ट्रपतीपदाची निवडणूकही लढली


१९९७ मध्ये शेषन यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढली होती. पण के.आर.नारायणन यांच्यासमोर शेषन यांचा पराभव झाला. दोन वर्षानंतर शेषन यांनी काँग्रेसच्या तिकीटावर आडवाणींच्याविरोधात निवडणूक लढली. पण या निवडणुकीतही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. १९९६मध्ये शेषन यांना मॅगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.