Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना होणार अटक? AAP च्या नेत्यांचा दावा
Arvind Kejriwal News: सौरभ यांच्यासह आतिशी सिंह यांनीही ट्विट केलंय की, अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आज सीएम केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकणार असून त्यांना अटकही केली जाऊ शकते.
Arvind Kejriwal News: आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आज अटक करू शकतात, असा दावा आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून केला जातोय. आप पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी ट्विट केलंय की, गुरुवारी सकाळी ईडी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी पोहोचून त्यांना अटक करणार आहे.
सौरभ यांच्यासह आतिशी सिंह यांनीही ट्विट केलंय की, अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आज सीएम केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकणार असून त्यांना अटकही केली जाऊ शकते.
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या तिसऱ्या समन्सवरही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहिले नव्हते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी तपास एजन्सीला पत्र देखील लिहिलं. या पत्रात त्यांनी तपास एजन्सीसमोर हजर न राहण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. राज्यसभा निवडणुकीमुळे व्यस्त असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
यावेळी ही नोटीस बेकायदेशीर असल्याचं वर्णन करताना केजरीवाल म्हणाले होते की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाशी संबंधित प्रश्नांची यादी पाठवावी. त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी ते तयार आहेत. दिल्ली उत्पादन शुल्क प्रकरणात ईडीचे अधिकारी कोणतंही कारण नसताना गुप्तता पाळून मनमानीपणे वागतायत.
केजरीवाल यांनी असंही म्हटलंय की, समन्स त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच ते सार्वजनिक झालं होतं. अशा स्थितीत समन्स बजावण्याचा उद्देश त्याची चौकशी करण्याचा की त्याच्या प्रतिष्ठेला डागाळण्याचा, असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय.
ऑक्टोबरमध्ये जाहीर केला होता समन्स
ईडीने ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही समन्स बजावला होता. त्यांना 2 नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र त्यावेळीही तो तपास यंत्रणेसमोर हजर झाला नाही. त्यांनी वेगवेगळ्या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्याचं कारण दिलं होतं. 2 नोव्हेंबर रोजी त्याच्या वकिलांनी ईडीचे समन्स बेकायदेशीर म्हटलं होतं.