प्रियंका गांधींसमोर मुलांचे मोदींबद्दल अपशब्द, स्मृती इराणींची टीका
स्मृती इराणींची व्हिडिओवरुन टीका
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे ४ टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता देशात पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार सुरु आहे. ६ मे ला अनेक महत्त्वाच्या मतदारसंघात मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघातही मतदान होणार आहे. येथून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मैदानात आहेत. राहुल गांधी यांच्यासाठी प्रियंका गांधी या प्रचार करत आहेत. प्रियंका गांधी यांच्यासमोर यावेळी मुलांनी चौकीदार चोर है चे नारे दिले. सोबतच पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्दांचा वापर करण्यात आला. यावर स्मृती इराणी यांनी टीका केली आहे.
स्मृती इराणी यांनी बुधवार सकाळी एक ट्विट केलं. ज्यामध्ये एक व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये काही मुलं मोदींच्या विरोधात घोषणा देत आहेत.
स्मृती इराणी यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी यांच्या समोर या घोषणा दिल्या गेल्या. पण त्यानंतर प्रियंका गांधी यांनी त्या मुलांना अशा घोषणा देण्यापासून रोखलं. त्यांनी म्हटलं की, 'ही घोषणा देऊ नका. चांगले मुलं बना.' त्यानंतर मुलांनी राहुल गांधी यांच्या समर्थनात नारे दिले.
अमेठीतून स्मृती इराणी या राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. २०१४ मध्ये त्यांचा येथून पराभव झाला होता. पण त्यांनी येथे राहुल गांधींना कडवं आव्हान दिलं होतं. गेल्या ५ वर्षात त्यांनी येथे मोठ्या प्रमाणात जनसंपर्क सुरु ठेवला. त्यामुळे अमेठीची जनता कोणाच्या बाजुने कौल देते हे पाहावं लागेल.