नवी दिल्ली: काश्मीर मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात वातावरणनिर्मिती करण्याच्या पाकिस्तान आणि चीनच्या प्रयत्नांना संयुक्त राष्ट्रसंघात चांगलीच चपराक बसली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषेदतील चीन वगळता सर्वच देशांनी काश्मीर मुद्द्यावर हस्तक्षेप करण्यास देण्यास नकार दिला. बंद दाराआड झालेल्या या चर्चेत चीनने पाकिस्तानची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे सर्व प्रयत्न फोल ठरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारा अनुच्छेद ३७० रद्द केला होता. त्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने काश्मीर प्रश्नात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप व्हावा, अशी मागणी केली जात आहे. 



कायम पाकिस्तानची तळी उचलून धरणाऱ्या चीनने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसमोर हा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर बंद दाराआड संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी चीनने अनुच्छेद ३७० रद्द झाल्यामुळे काश्मीरमध्ये अशांतता निर्माण झाल्याचे सांगत भारत व पाकिस्तानने तणाव न वाढवता शांततेनेच या प्रश्नावर मार्ग काढावा, असे नमूद केले. 


परंतु, यावेळी रशियाने भारताची बाजू उचलून धरली. काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. भारत आणि पाकिस्तान हे आपापसांत चर्चा करूनच ही समस्या निकाली काढू शकतात. यामागे आमचा कोणताही छुपा अजेंडा नाही. दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानने हा प्रश्न चर्चेनेच सोडवावा, असे रशियाचे संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी देमित्री पोलिन्स्की यांनी सांगितले. 


यावेळी संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ही आमची अंतर्गत बाब असल्याचे स्पष्ट केले. काश्मीरमधील लोकांच्या भल्यासाठीच अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन सरकार टप्प्याटप्प्याने काश्मीरमधील निर्बंध हटवेल, असेही अकबरुद्दीन यांनी सांगितले.