लेह: पँगाँग सरोवरच्या परिसरात भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न विफल ठरल्यानंतर आता चीनकडून आपल्या सैनिकांना नवी शस्त्रे देण्यात आली आहेत. याची काही छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये चिनी सैनिकांच्या हातात लांब दांडा असलेले धारदार पात्याचे मोठे सुरे दिसत आहेत. तसेच सैनिकांच्या रायफल्स मात्र पाठीवर अडकवलेल्या दिसत आहेत. त्यामुळे आता चिनी सैन्याकडून भारताची पुन्हा कुरापत काढली जाण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलखोल! LAC वर गोळीबार चीनकडूनच

गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर २९-३० ऑगस्टच्या रात्रीपासून चिनी सैन्य पुन्हा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, भारतीय जवानांनी प्रत्येकवेळी चिनी सैन्याला पिटाळून लावले. एरवी चिनी सैनिकांकडे सुरे असल्याने भारतीय जवान त्यांना स्वत:च्या आसपास फिरकून देत नाहीत. अन्यथा गलवान खोऱ्यासारखा रक्तरंजित संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. गलवान खोऱ्यात चिनी लष्कराने भारतीय सैन्याला मारण्यासाठी लोखंडी रॉडसचा वापर केला होता. या झटापटीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरातही चीनचे अनेक जवान मारले गेले होते. 

यानंतर आता पँगाँग सरोवराच्या परिसरात चीनकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, प्रत्येक आघाडीवरील भारतीय जवान हे कमालीचे सतर्क आहेत. भारतीय सैन्याने आतापर्यंत एकदाही चिनी सैन्याला आपल्या आसपास फिरकून दिलेले नाही. त्यामुळे आता चिनी सैनिकांकडून लांबूनच भारतीय जवानांवर वार करण्यासाठी लांब दांड्याच्या सुऱ्यांचा वापर केला जाऊ शकतो. कालच या भागात झालेल्या संघर्षादरम्यान हवेत गोळीबार झाला होता. यानंतर पँगाँग सरोवराच्या परिसरातील वातावरण आणखीनच तणावपूर्ण झाले आहे. सध्या फिंगर एरिया, गलवान खोरे, हॉट स्प्रिंग आणि कोनगुरुंग नाला या भागांमध्ये भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे.