नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मुद्यावरुन राणे आणि शिवसेना यांच्यात नवा राजकीय वाद होण्याची शक्यता आहे. 
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज कोकणासाठी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ बांधून तयार आहे, विमान वाहतूक सुरु करण्यासाठी येत्या 9 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे. 


आम्ही स्थानिक नाही का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014 मध्ये आपण स्वत: विमानतळ बांधून तयार केलं. मी स्थानिक आहे, निलेश राणे आणि नितेश राणे स्थानिक आहेत. आम्ही स्थानिक असल्यामुळे आणि आम्हीच विमानतळ बांधल्यामुळे आमचा अधिकार आहे. त्यामुळे कोणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नये असं सांगत नारायण राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 5 सप्टेंबर रोजी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होणार आहे, अशी माहिती दिली होती. 


मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देणार?


विमानतळाच्या उद्धाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही.संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत. मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही, असं राणे म्हणाले.


शिवसेनेने कोकणासाठी काय केलं?


अतिवृष्टी आली, वादळ आलं, पण कोकणासाठी काहीही मदत देण्यात आली नाही. शिवसेनेनं कोकणात एकही प्रकल्प राबवला नाही. आज पाटबंधारे प्रकल्पाची काम, रस्त्याची कामं, ब्रिजची काम सर्व बंद आहेत. गेल्या अडीच वर्षात एकही विकासकाम सुरु नाहीए, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. शिवसेना आणि खासदार कलेक्शन मास्टर असल्याचा आरोप यावेळी नारायण राणे यांनी केला.


कोणत्या विचारसरणीचे मुख्यमंत्री?


मुख्यमंत्री बोलतात एक आणि वागतात वेगळं, अशी टीका यावेळी नारायण राणे यांनी केली. हिंदूंच्या सणांवेळी निर्बंध का? घरावर दगडफेक करताना पाचशे लोक एकत्र आली होती, त्यावेळी बंदी का नाही घातली असा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे. जे घरावर दगड मारतात त्यांचा मुख्यमंत्री सत्कार करतात, हे कोणत्या विचारसरणीचे मुख्यमंत्री आहेत अशी टीकाही राणे यांनी केली आहे. 


तिसऱ्या लाटेची भीती दाखवली जात आहे


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची केवळ भीती दाखवली जात आहे, भीती दाखवून यांना घरातच बसायचं आहे. तिसरी लाट बाकीच्या राज्यात नाहीए का, फक्त महाराष्ट्रातच आहे का, इतकं करुनही महाराष्ट्रात लाखो लोकं कोरोनामुळे गेली. डॉक्टर नाही, वॅक्सिन नाही, आरोग्या सुविधा नाही, अशी अवस्था महाराष्ट्राची आहे.