मुंबई : जगभरात ख्रिसमसचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मुंबईसह देशातही ख्रिसमसची धमाल सुरु आहे. ख्रिसमसचा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरळीतल्या ग्रेस सलडाना आणि डगलस सलडाना यांच्या घरीही ख्रिसमससाठी अशीच खास सजावट केली गेली आहे. विशेष म्हणजे सलडाना यांच्या घरातला उंच ख्रिसमस ट्री आणि आकर्षक सजावटीसाठी याधीच त्यांची लिमका बूक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. 
 
जुहूमध्ये खास कॅरलचं आयोजन


कॅरल म्हणजे गीतं ही ख्रिसमसची अनोखी ओळख. ख्रिसमस निमित्तानं मुंबईतल्या जुहू समुद्रकिनारी खास कॅरलचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजात शांती आणि बंधुभाव वाढीस लागावा यासाठी या विशेष कॅरलचं आयोजन करण्यात आलं होतं. 


जुहू चौपाटीवर सांताक्लॉजची 12 फूट उंचीची प्रतिकृती


जुहू चौपाटीवर सांताक्लॉजची 12 फूट उंचीची प्रतिकृती साकारण्यात आलीये. लक्ष्मी गौर या महिला कलाकारानं वाळूच्या सहाय्यानं ही प्रतिकृती साकारलीये.. वडिलांकडून मिळालेली कला जतन करण्यासाठी त्यांनी ही प्रतिकृती साकारलीये.. या उपक्रमातून त्यांनी पर्यावरण रक्षणाचाही संदेत दिलाय.  सध्या सांताक्लॉजची ही प्रतीकृती मुंबईकरांमध्ये आकर्षणाचा विषय झाला असून जुहू चौपाटीवरील ही जागा सेल्फी पॉइंट म्हणून प्रसिद्ध झालीये. 


मध्य प्रदेशात शाळकरी मुलांसाठी ख्रिसमसचं आयोजन


मध्यप्रदेशातल्या भोपाळमध्ये शाळकरी मुलांसाठी खास ख्रिसमसचं आयोजन करण्यात आलं होतं. लहान मुलांना मौजमस्ती आणि धमाल करता यावी यासाठी खास मुलांसाठीच या ख्रिसमसचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये केक, चॉकेलट, आईस्क्रीम, नाचगाणी यासह, खास मुलांसाठी रॅम्प वॉकचाही समावेश करण्यात आला होता. सर्व लहानग्यांनी या ख्रिसमस पार्टीमध्ये मनमुराद आनंद लुटला. 


उत्तराखंडमध्ये ख्रिसमसचा उत्साह


ख्रिसमस निमित्त ख्रिस्ती समाज चर्चमध्ये जाऊन प्रेयर म्हणजेच प्रार्थना करतात. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून चर्चच्या इमारती ओळखल्या जातात. चर्चची अशीच एक देखणी वास्तू, उत्तराखंडमधल्या हल्दवानी जिल्ह्यातल्या माना गावात आहे. 1918 मध्ये वसललेल्या माना आणि लगतच्या 2 गावांतल्या ख्रिस्ती समुदायासाठी, ब्रिटिशांनी 1935-36 मध्ये कॅथॉलिक चर्चची ही देखणी वास्तू बांधली. या चर्चचा कारभार ख्रिस्ती मिशनद्वारे पाहिला जातो. नाताळ निमित्त 24 डिसेंबरच्या रात्री येशूजन्म निमित्तानं रात्री 8 वाजता या चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचं आयोजन केलं जातं. तर 25 डिसेंबरपासून नाताळचा सण साजरा केला जातो. यावेळी ख्रिस्ती समुदाय इथे मोठ्या संख्येनं एकत्र जमतो. 


गुवाहाटीमध्ये ख्रिसमसनिमित्त बाजापेठा फुलल्या


गुवाहाटीमध्येही ख्रिसमस सणाची तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. ख्रिसमसचा सण आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. तर चर्चमध्येही सजावट करण्यात आली आहे. सोबतच येशूजन्माचा देखावा साकारण्यात आला आहे. यात गोठा, गाई, बाळ येशू, असा देखावा तयार करण्यात आला आहे. तर येशूजन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी आबालवृद्ध नाटिका सादर करणार आहेत. त्याची तयारीही जोरात सुरु आहे. ख्रिसमसचा सण हा आनंद आणि शांतीचा संदेश देणारा आहे. समाजात बंधुत्व आणि सलोखा वाढीस लागावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करण्याचं आवाहन, या निमित्तानं करण्यात आलं आहे. 


कुर्ला ख्रिश्चन व्हिलेजमध्येही नाताळची जोरदार तयारी


जगभरात येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाची जय्यत तयारी सुरु असताना, मुंबई उपनगरातल्या कुर्ला ख्रिश्चन व्हिलेजमध्येही नाताळची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती वस्ती असलेलं कुर्ला ख्रिश्चन व्हिलेज, ख-या अर्थानं सर्वधर्म समभावाचं प्रतिक म्हणून ओळखलं जातं. या गावात नाताळ निमित्त  येशूचा जन्म झालेल्या गोठ्याची प्रतिकृती उभारण्याची स्पर्धा घेतली जाते. यामध्ये आबालवृद्ध दरवर्षी सहभागी होतात. नाताळ निम्मित इथल्या शेकडो वर्ष जुन्या होली क्रॉस चर्चमध्येही जोरदार तयारी करण्यात आली असून, येशू जन्मदिनी रात्री याच ठिकाणी संपूर्ण कुर्ला ख्रिश्चन गाव इथे एकत्र येत येशूचा जन्मोत्सव साजरा करतं. 


मुरादाबादमध्ये लहानग्यांचा ख्रिसमस


उत्तर प्रदेशमधल्या मुरादाबादमधल्या लहानग्यांनीही ख्रिसमसचा सण अनोख्या पद्धतीनं साजरा केला. मुरादाबाद शहरातल्या बोन ऍन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ख्रिसमसच्या माध्यमातून स्वच्छ भारत आणि हरीत शहराचा संदेश दिला. स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळकरी मुलांनी मानवी साखळी तयार केली. तर शाळेतल्या वरच्या वर्गातल्या मुलांनी रॅली काढून स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं.