Christmas Notice To Schools About Children Dress Up As Santa Claus: मध्य प्रदेशमधील साहजापूर जिल्ह्यामधील शिक्षण अधिकाऱ्यांनी एक अजब नोटीस जारी केली आहे. नाताळाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळांना इशारा देणारी नोटीस जारी केली आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, शिक्षण अधिकाऱ्यांनी नाताळ साजरा करणाऱ्या शाळांना इशारा दिला आहे. पालकांच्या लेखी परवानगी शिवाय मुलांना नाताळाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी करुन घेतल्यास शाळांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.


लेखी परवानगी आवश्यक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्धा डिसेंबर संपल्यानंतर लगेच नाताळाचे वेध लागतात. अनेक शाळांना नाताळानिमित्त सुट्टी असल्याने नाताळाआधीच शाळांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये अगदी सिक्रेण्ट सांतापासून ते फॅन्सी ड्रेसपर्यंत अनेक कार्यक्रमांचा समावेश असतो. मात्र हीच गोष्ट लक्षात घेत मध्य प्रदेशमधील शिक्षण अधिकाऱ्यांनी 14 डिसेंबर रोजी एक नोटीस जारी केली. नाताळानिमित्त सांताक्लॉज किंवा ख्रिसमस ट्री म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतील एखाद्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी करुन घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांच्या पालकांची किंवा त्यांचा संभाळ करणाऱ्यांनी लेखी परवानगी आवश्यक असणार आहे. वादाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हे आदेश देण्यात आल्याचा युक्तीवाद करत शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.


...म्हणून जारी केली नोटीस; अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण


"या संदर्भात तक्रारी आल्यास तुमच्या संस्थेवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल," असा इशाराच या नोटीसमध्ये शाळांना देण्यात आला आहे. साहजापूर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी विवेक दुबे यांनी या नोटीसबद्दल 'एनडीटीव्ही'शी बोलताना, या नोटीसचा अर्थ शाळेत नाताळाच्या सेलिब्रेशनवर बंदी घालण्यात आली आहे असा होता नाही, असं स्पष्ट केलं. "यापूर्वी पालकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत की त्यांची परवानगी न घेता शाळा विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी करुन घेतात. अशा गोष्टी घडू नयेत म्हणून नोटीस जारी करण्यात आली आहे. वाद झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा असे वाद होण्याआधीच रोखलेले बरे," असंही दुबे यांनी सांगितलं.


मागील वर्षी विश्व हिंदू परिषदेनं केलेली मागणी


मागील वर्षी मध्य प्रदेशमध्ये विश्व हिंदू परिषदेने विद्यार्थ्यांना पालकांच्या लेखी परवानगीशिवाय शाळांमधील सेलिब्रेशनमध्ये सांताक्लॉजचे कपडे घालू नये अशी मागणी केली होती. अशाप्रकारची वागणूक म्हणजे हिंदू धर्मावरील संस्कृतिक हल्ला असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेनं केला होता. 'हिंदू मुलांना ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे,' असा दावा विश्व हिंदू परिषदेने त्यावेळेस केला होता.