बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगनी रणौतला (Kangana Ranaut) कानाखाली लगावणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरची (Kulwinder Kaur) बदली करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुलविंदर कौरसह तिच्या पतीचीही बदली करण्यात आली आहे. कुलविंदर कौरने चंदीगड विमानतळावर कंगनाच्या कानाखाली लगावली होती. यानंतर तिच्यावर कारवाई करत निलंबन करण्यात आलं होतं. दरम्यान आता तिला पुन्हा सेवेत घेण्यात आलं असून आता बंगळुरुला बदली करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलविंदर कौरने कंगनाच्या कानाखाली मारल्यानंतर तिचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामुळे तिने कानाखाली का मारली याचा खुलासा केला होता. 'कंगनाने 100 रुपये घेऊन महिला शेतकरी आंदोलनात बसल्या होत्या असं म्हटलं होतं. त्यावेळी माझी आईही आंदोलनात सहभागी होती,' असं तिने म्हटलं होतं. कंगनाने देशात झालेल्या शेतकरी आंदोलनावर टीका करताना इंदिरा गांधी यांनी खलिस्तानींना मच्छरांप्रमाणे चिरडलं होतं असं म्हटलं होतं. 


नेमकं काय झालं होतं?


हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून निवडणूक जिंकणारी कंगना रणौत दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती. यावेळी सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरने कंगना रणौतच्या कानाखाली लगावली होती. या घटनेचा व्हिडीओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओत कंगना चेक इन काऊंटवर पोहोचल्यानंतर शाब्दिक वाद होताना दिसत होता. पण व्हिडीओत कानाखाली लगावतानाचा क्षण कैद झालेला नव्हता.


या घटनेनंतर कंगना रणौतने व्हिडीओ जारी करत आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. तसंच पंजाबमधील वाढत्या दहशतवादावर चिंता व्यक्त केली होती. "मी सुरक्षित आहे. मी पूर्णपणे ठीक आहे. सुरक्षा तपासणीच्या वेळी ही घटना घडली. महिला सुरक्षारक्षकाने मी तेथून बाहेर पडण्याची वाट पाहिली. नंतर तिने बाजूने येऊन माझ्यावर हात उचलला. मी विचारलं की मला का मारलं? ती म्हणाली, 'मी शेतकऱ्यांचे समर्थन करते'. मी सुरक्षित आहे, पण पंजाबमधील वाढत्या दहशतवादाची मला चिंता आहे. ते आपण कसं हाताळणार आहोत?", असं कंगनाने व्हिडीओत सांगितलं होतं. 


 


कंगनाने सीआयएसएफ जवानाला समर्थन देणाऱ्यांना सुनावलं


शनिवारी कंगनाने सीआयएसएफ जवानांना पाठिंबा देणाऱ्यांना उद्देशून एक मोठी नोट शेअर केली. "प्रत्येक बलात्कारी, खुनी, किंवा चोराकडे गुन्हा करण्यासाठी नेहमीच एक मजबूत भावनिक, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक कारण असते, कोणताही गुन्हा विनाकारण घडत नाही, तरीही त्यांना दोषी ठरवून तुरुंगात टाकले जाते. जर तुम्ही गुन्हेगाराच्या भावनिक कारणाशी सहमती दर्शवत असाल तर देशाच्या सर्व कायद्यांचे उल्लंघन करत आहात," असं तिने लिहिलं होतं.