भाजपने दडपशाहीने CAB मंजूर करवून घेतले- संजय राऊत
भाजपकडून ध्रुवीकरणाचं राजकारण सुरु आहे.
नवी दिल्ली: भाजपने राज्यसभेत दडपशाही करून नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAB) मंजूर करवून घेतल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. यापूर्वी शिवसेनेने लोकसभेत Citizenship Amendment Bill विधेयकाला पाठिंबा दिला होता. मात्र, राज्यसभेत शिवसेनेने या विधेयकाविरोधात भूमिका घेत सभात्याग केला. त्यामुळे शिवसेनेने आपली भूमिका अचानक का बदलली, असा सवाल उपस्थित झाला होता.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी 'झी २४ तास'शी बोलताना भाजपवर दडपशाहीचा आरोप केला. मी सभागृहात बोलत असताना माईक बंद करण्यात आला. संसदीय पक्षाचा नेता असूनही माझा आवाज बंद करण्यात आला. CAB मंजूर करवून घेण्यासाठी भाजपने अनेक लहान पक्षांना आमिष दाखवले. तर काहींचा आवाजच दडपण्यात आला. भाजपने संसदेच्या सभागृहात एकप्रकारची आणीबाणीच लागू केली होती. इंदिरा गांधी यांनीही संसदेत अशाप्रकारची आणीबाणी आणली नव्हती. मात्र, आता सभागृहात माझ्यासारख्या ज्येष्ठ सदस्यावरही दडपशाही केली जातेय, असे राऊत यांनी सांगितले.
'एका रात्रीत असं काय घडलं की शिवसेनेने विधेयकाला पाठिंबा दिला नाही ?'
यावेळी संजय राऊत यांनी राज्यसभेत CAB ला विरोध करण्यामागील कारणही सांगितले. त्यांनी म्हटले की, देशात सध्या ध्रुवीकरणाचे राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे. देशात महागाई, बेरोजगारी असताना त्यावरून लक्ष विचलित केले जात आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप हे सर्व करत असल्याचा आरोपही यावेळी राऊत यांनी केला.
तसेच काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने राज्यसभेत भूमिका बदलल्याचा आरोपही राऊत यांनी फेटाळून लावला. आम्ही कोणाच्याही दबावतंत्राला घाबरत नाही. आम्ही संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सदस्य नाही. भाजपसोबत असतानाही आम्ही आमच्या भूमिका मांडतच होतो. महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही धार्मिक अधिष्ठानावर नव्हे तर समान किमान कार्यक्रमावर चालत आहे. त्यामुळे राष्ट्रीय प्रश्नांचा मुद्दाच येत नाही. परिणामी पुढील पाच वर्षे तिन्ही पक्षांचा समन्वय कायम राहील, असे राऊत यांनी सांगितले.