नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर शनिवारी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते मायावती आणि अखिलेश यांची देखील भेट घेणार आहेत. यानंतर त्यांची एक पत्रकार परिषद देखील होऊ शकते. निकालाआधीच विरोधकांना एकत्र करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरु केले आहेत. काँग्रेसने शुक्रवारी म्हटलं होतं की, एक प्रगतीशील आणि धर्मनिरपेक्ष सरकारचं नेतृत्व करण्यासाठी काँग्रेस तयार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेत्यांसोबत फोनवर चर्चा सुरु केली आहे. २२ आणि २३ मेला त्यांनी बैठकीसाठी नेत्यांना आमंत्रण केलं आहे. पण अनेक नेत्यांनी २३ मेच्या निकालाआधी बैठकीत येण्यास नकार दिला आहे. 


चंद्राबाबू नायडू हे निवडणुकीच्या आधीपासूनच महाआघाडीसाठी प्रयत्न करत होते. भाजप आणि मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी याआधी देखील प्रयत्न केले. पण महाआघाडीमध्ये मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांनी नकार दिला. निकालानंतर काही तरी हाती येण्याची आशा या सर्व प्रादेशिक पक्षांना आहे. त्यामुळे निकालानंतरच सर्व काही स्पष्ट होणार आहे.