पटना : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्या निर्णयानंतर सगळ्याच क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी म्हटलं की, 'या निर्णयामुळे बिहार सरकारची संपूर्ण प्रक्रिया योग्य असल्याचे स्पष्ट झाले. आता मला विश्वास आहे की सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेल.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएम नितीशकुमार म्हणाले की, 'आमच्या सरकारने जे काम केले ते कायदेशीर होते, सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी कारवाई केली गेली. आता मला विश्वास आहे की सीबीआय कसून चौकशी करुन न्याय देईल. न्यायाची आशा फक्त कुटूंब किंवा बिहारलाच नाही तर संपूर्ण देशातील लोकांना आहे.'



सीएम नितीशकुमार यांच्याआधी डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, मी खूप आनंदी आहे. हा अन्यायविरूद्ध न्यायाचा विजय आहे. 130 कोटी लोकांच्या भावनांचा हा विजय आहे. आता लोकांना आशा आहे की, सुशांत प्रकरणाचे सत्य समोर येईल. संपूर्ण देशासाठी ही खूप मोठी बातमी आहे.'



मुंबई पोलिसांच्या आरोपाचा संदर्भ देताना डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, 'तुम्ही गुन्हा का दाखल केला याचा आमच्यावर आरोप केला जात आहे. आम्हाला चौकशी करण्याची परवानगी नव्हती. जेव्हा आम्ही आयपीएस अधिकारी पाठवतो तेव्हा त्याला रात्री कैद्याप्रमाणे अलग ठेवण्यात आले. असं वाटलं की काहीतरी गडबड आहे.'