मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटर विराट कोहलीनं दिलेलं 'फिटनेस चॅलेंज' पूर्ण करत आपला व्यायाम करताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यावेळीच त्यांनी आयपीएस अधिकारी, कॉमनवेल्थमध्ये चर्चेत राहिलेली आणि भारताची नंबर वन महिला टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना हे चॅलेंज दिलं. त्यावर कुमारस्वामी यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून पंतप्रधानांना प्रत्यूत्तर दिलंय. 


आपल्या ट्विटमध्ये कुमारस्वामी म्हणतात 'प्रिय नरेंद्र मोदीजी, माझ्या तब्येतीसाठी काळजी करण्यासाठी आभार... शारीरिकरित्या फिट राहणं नेहमी उत्तम, असं मला वाटतं. मी या मोहिमेचं समर्थन करतो. योगा आणि ट्रेड मीलवर चालणं माझ्या दिनचर्येचा भाग आहे. मला माझ्या राज्याच्या विकासासाठी आणि फिटनेससाठी जास्त काळजी आहे त्यासाठी मला तुमची सोबत हवी आहे'. परंतु, सोशल मीडियावरचा हा खेळ पुढे सरकारवणं मात्र कुमारस्वामींनी टाळलं... त्यांनी ना आपला व्यायाम करताना व्हिडिओ ट्विट केला... ना चॅलेंजची ही साखळी पुढे सरकावत कुणाला टॅग करून हे आव्हान दिलं...



सोशल वेबसाईटवर #FitnessChallenge ट्रेन्डिंगवर आहे. या साखळीत क्रिकेटर विराट कोहली यानं आपला फिटनेस ट्रेनिंग व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही चॅलेंज दिलं होतं. याला उत्तर देताना आपण नक्कीच आपलाही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. आपला शब्द पूर्ण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल वेबसाईटवर आपला फिटनेस फंडा शेअर केला होता.