मुंबई : जेएनयूमधला हिंसाचार पाहून २६/११ दहशतवादी हल्ल्याची आठवण आली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. जामिया हिंसाचारावेळी उद्धवना जालियानवाला बागेची आठवण झाली होती आणि आता मुंबई दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली. यातून उद्धव ठाकरेंना नेमकं काय सांगायचं आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा हिंसाचार थेट केंद्र सरकार पुरस्कृत आहे का, अशी शंकाच ते व्यक्त करत आहेत. जालियानवाला बाग, २६/11 हल्ला एवढी आक्रमक वक्तव्यं करुन उद्धव थेट भाजप आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला अंगावर घेत आहेत. या सगळ्याला उत्तर द्यायला ते केंद्र सरकारला बांधील करतायंत. आणि पुढे आणखी वाईट घडेल, हे आपण आधीच सांगितलं होतं, असा इशाराही देत आहेत.


जेएनयूमधल्या हिंसाचार पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ला आठवला, असं त्यांनी म्हटलं. याआधी ही जामिया मिलियामधल्या हिंसाचारावेळी त्यांनी हे तर जालियानवाला बाग हत्याकांडाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या खणखणीत आणि दणदणीत वक्तव्यांमागे एक सणसणीत मेसेज आहे.


त्याचवेळी महाराष्ट्रात असं काही घडलं तर आपण समर्थ असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी खमकेपणानं सांगितलं. २६/11 आणि जालियनवालासारख्या घटनांशी सध्याच्या हिंसाचाराची तुलना करुन मुख्यमंत्र्यांनी थेट मोदी-शाहांना अंगावर घेतलं आहे असंच म्हणावं लागेल.