CM Yogi Adityanath Talk With Momo's Seller:  उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या व्यक्तीमत्वाचा हलकापुलका अंदाज एका कार्यक्रमात पाहायला मिळाला. येथील एका दुकानदाराबरोबर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार रवि किशन यांची थट्टा केली. मुख्यमंत्र्यांनी दुकानदाराकडे रवि किशन यांच्याबद्दल चौकशी करताना, मोमोज खालल्यानंतर रवि किशन यांनी पैसे दिले होते का? असं विचारलं. योगी आदित्यनाथ यांचं हे विधान ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांसहीत सर्वांनाच हसू अनावर झालं. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की बुधवारी, जे. पी. नड्डा हे गोरखपूरमध्ये होते. या ठिकाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद् चौधरी यांच्याबरोबर पक्षाचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. या सर्वांनी नड्डा यांचं स्वागत केलं. यानंतर सर्व नेते कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. या कार्यक्रमादरम्यान हसत हसत योगी आदित्यनाथ यांनी एका दुकानदाराला, "यापैकी (भाजपा नेत्यांपैकी) कोणी तुमच्या दुकानात आलं होतं का?" असा प्रश्न विचारला. त्यावर दुकानादाराने, "हो खासदार (रवि किशन) आले होते," असं उत्तर दिलं. 


नड्डांनाही हसू आवरलं नाही


यावर योगी आदित्यनाथ यांनी प्रतीप्रश्न करताना, "काय खाल्लं त्यांनी?" असं विचारलं. दुकानदाराने एका शब्दात 'मोमोज' असं उत्तर दिलं. हे ऐकून आदित्यनाथ यांनी मस्करीच्या स्वरामध्ये, "पेमेंट वगैरे केलं की नाही त्यांनी?" असं विचारलं. हा प्रश्न ऐकून जे.पी. नड्डा, भूपेंद्र चौधरींसहीत इतर भाजपा नेते हसू लागले. 


हे ऐकताच रवि किशन जागेवर उभे राहिले अन्...


रवि किशन हे योगी आदित्यनाथ यांच्या मागील रांगेतच बसले होते. ही चर्चा ऐकून ते जागेवरुन उठले आणि त्यांनी दुकानदाराला, "मी पैसे दिले होते की नाही ते सांगा ना" असं म्हणताच दुकानादाराने 'होय दिले होते,' असं उत्तर दिलं. हा संवाद ऐकून सारे अजूनच हसू लागले.


नड्डा यांचं मार्गर्शन


जे.पी. नड्डा यांचा हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीशी जोडून पाहिला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये 'विकसित भारताची संकल्प यात्रा' मोहिमेची सुरुवात केली आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना नड्डा यांनी मार्गदर्शन केलं. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकींमध्ये 3 राज्यांत मिळालेली सत्ता ही 2024 च्या निवडणुकीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी उत्तम असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणामध्ये डबल इंजिन सरकारच्या नेतृत्वामध्ये नवीन गोरखपूर आकार घेत असल्याचं म्हटलं.