नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये गेल्या २२ वर्षांमधील सर्वाधिक कडाक्याची थंडी यंदाच्या वर्षी पडली आहे. गेल्या शंभर वर्षांमध्ये अशी कडाक्याची थंडी पडण्याची ही पाचवी वेळ आहे. स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार १९०१पासून २०१८ पर्यंत फक्त चार वेळा म्हणजेच १९१९, १९२९, १९६१ आणि १९९७ या वर्षांमध्ये डिसेंबर महिन्यातील कमाल तापमान हे २० अंशांपेक्षा कमी झालं होतं. दिल्लीमध्ये किमान तापमानाचा आकडा पाहता अनेकदा तर, शिमल्याहूनही खाली गेल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारत थंडीमुळे पुरता गारठला आहे. जम्मू काश्मीरमधील तापमान पाहता श्रीनगरमध्ये या दशकातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी मोठं आकर्षण असणारं सुप्रसिद्ध दल लेकही थंडीमुळे गोठलं आहे. श्रीनगरमध्ये तापमान उणे ५.६ पर्यंत खाली घसलं आहे. 



जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गमध्येही थंडीने कहर केला आहे. इथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे. गुलमर्गचं तापमान हे उणे ६ अंशांपर्यंत घसरलं आहे. तापमान खाली गेल्यामुळे येथे सर्वत्र बर्फाची चादर पसरलीय. पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद लुटला. जवळपास ४ ते ५ फूटांपर्यंत बर्फ या परिसरात साचला होता. झाडांवर, गाड्यांवर, सगळीकडे नुसता बर्फच बर्फ पाहायला मिळत आहे. 



उत्तराखंडच्या केदारनाथमध्येही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आगे. या बर्फवृष्टीमुळे मंदिराचं पुनर्निमाण कामही थांबलं आहे. मंदिर परिसरात साचलेल्या या बर्फामुळे परिसरातील पाणी आणि वीजपुरवठाही बंद झाला आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्याव लागत आहे.